मुंबई - मुंबईसह राज्यात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना एकीकडे मात्र रुग्णालयात लागणाऱ्या आगीचे सत्र सुरुच आहे. बुधवारी मध्यरात्री मुंब्राच्या कौस येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये सातत्याने लागणाऱ्या आगींवरून भाजपा नेते किरीट सोमैया यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सरकारला जाग कधी येणार असा संतप्त सवाल सोमैया यांनी विचारला आहे.
प्राईम रुग्णालयात एकूण १७ रुग्ण उपचार घेत होते. त्यातील ४ जणांचा दुसऱ्या रुग्णालयात नेताना व आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आगीची माहिती मिळताच मुंब्र्याचे आमदार व राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड तसेच ठाणे महापालिकेचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली.