महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Kirit Somaiya Allegations : किरीट सोमय्या, डझनभर नेते अन् आरोपांची राळ - किरीट सोमय्यांनी आरोप केलेली माहिती

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर अनेक नेत्यांच्या घरांवर ईडी, आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यातील अनेकांची संपत्तीही केंद्रीय तपास यंत्रणांनी जप्त केली आहे.

kirit somaiya
भाजप नेते किरीट सोमय्या

By

Published : Apr 14, 2022, 9:00 PM IST

मुंबई -भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आतापर्यंत अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र, जेव्हा त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा ते गायब झाल्याची चर्चा होती. न्यायालयाने अटकपूर्व जामीन देत दिलासा देईपर्यंत ते गायब होते. इतरांना चौकशीचे आव्हान देणारे सोमय्या (Kirit Somaiya Allegation) यांनी आतापर्यंत कोणकोणत्या नेत्यांवर कोणते आरोप केले ते पाहूयात...

१) छगन भुजबळ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर किरीट सोमय्या सातत्याने आरोप करत आले आहेत. भुजबळ यांनी केलेल्या महाराष्ट्र सदन बांधकामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार ते बांधकाम मंत्री असताना केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. या आरोपानंतर भुजबळांना दोन वर्ष तुरुंगात जावे लागले. मात्र, सप्टेंबर 2021 मध्ये ते या प्रकरणातून दोषमुक्त झाले. तर ओन स्टोन कंपनीच्या नावाने भुजबळांनी मोठा गैरव्यवहार केला असून ही कंपनीच अस्तित्वात नसल्याचा आरोप करत भुजबळांनी 120 कोटी रुपये भ्रष्टाचार केल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता.

२) नारायण राणे - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी 2016 मध्ये केला होता. राणे यांचे निलम हॉटेल आणि ग्रुप ऑफ कंपनीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. काही कंपन्यांकडून कमी रुपयांचे समभाग दाखवून ते अधिक किमतीला विकल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी राणे यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात लूक आऊट नोटीसही जारी केली होती. मात्र, सध्या राणे भाजपावासी झाल्याने त्यांच्या विरोधातील आरोप सोमय्या विसरले आहेत.

३) अशोक चव्हाण - माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याविरोधात सोमय्यांनी आरोपांची राळ उडवली होती. आदर्श इमारतीमध्ये चव्हाण यांनी घोटाळा करून तीन सदनिका लाटल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. याप्रकरणी अखेरीस चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते.

४) अजित पवार - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी 2016 मध्ये सोमय्या यांनी आरोप केले होते. सिंचन प्रकल्पातील कंत्राटी वाटपात तसेच कामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. तसा कॅगनेही शेरा दिला होता. मात्र, डिसेंबर 2019 मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना सिंचन घोटाळा प्रकरणी क्लीन चिट दिली आहे. दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचार झाला असून हा कारखाना अजित पवार यांच्या नातेवाईकांचा असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.

५) अनिल परब - राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीतल्या दापोली येथे अनधिकृत बांधकाम करून रिसॉर्ट आणि बंगला उभारल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी सोमय्या हातोडा घेऊन दापोलीत नुकतेच दाखल झाले होते. वांद्रे पूर्वेकडील गांधीनगर येथील इमारतीतील 57 आणि 58 क्रमांकाच्या इमारतींमधील मोकळी जागा परब यांनी बळकावल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

६) प्रताप सरनाईक - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर अनधिकृत इमारत बांधण्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी डिसेंबर 2020 मध्ये केला होता. प्रताप सरनाईक यांनी 250 कोटी रुपये लाटले असून, विहंग हाऊसिंग स्कीम मध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. सरनाईक यांच्या कंपन्या अस्तित्वात नसल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. यासंदर्भात ईडीने सरनाईक यांची संपत्ती जप्त केली आहे.

७) मिलिंद नार्वेकर - शिवसेनेचे सचिव आणि ठाकरे कुटुंबियांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्यावरही सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोकणातील दापोली येथे नार्वेकर यांनी समुद्रकिनारी अनधिकृत बंगला बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. यानंतर नार्वेकर यांनी स्वतः हा बंगला काढून टाकला.

८) हसन मुश्रीफ - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्या यांनी केले. मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांनी साखर कारखाना तसेच विविध माध्यमातून घोटाळे करत शेकडो कोटींची बेनामी संपत्ती जमवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता.

९) भावना गवळी - शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी संस्थेमध्ये शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. सोमय्या यांनी आरोप केल्यानंतर काही दिवसांनी ईडी अधिकाऱ्यांनी गवळी यांच्या पाच संस्थांवर छापे टाकले तसेच त्यांच्या निकटवर्तीयांना ताब्यात घेतले.

१०) श्रीधर पाटणकर - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांच्यावर सदनिकांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. त्यानंतर ईडीने पाटणकर यांच्या मालकीच्या अकरा सदनिका ताब्यात घेतल्या आहेत.

११) नवाब मलिक -राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम यांची मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप सोमय्या आणि फडणवीस यांनी केला. या आरोपानंतर ईडीने मलिक यांना ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची संपत्ती जप्त केली असून नवाब मलिक सध्या कोठडीत आहेत.

१२) संजय राऊत - शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रा चाळ योजनेमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या आरोपानंतर ईडीने राऊत यांच्या सदनिका जप्त केल्या आहेत.

या सर्व नेत्यांवरील सातत्याच्या आरोपानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी विक्रांत युद्धनौकेसाठी निधी जमा करून अपहार केल्याचा आरोप केला. यासंदर्भात पोलिसांनी सोमय्या यांना नोटीस बजावली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details