महाराष्ट्र

maharashtra

अनिल परब यांचे शेतजमिनीवर अनधिकृत तीन मजली रिसॉर्ट.. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा - किरीट सोमैय्या

By

Published : May 19, 2021, 5:24 PM IST

Updated : May 19, 2021, 5:32 PM IST

मंत्री अनिल परब यांनी दापोली येथील मुरुड या भागामध्ये समुद्रकिनाऱ्यावर दहा कोटी खर्च करून बेकायदेशीरपणे बांधलेल्या रिसॉर्टबाबत भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप लावले आहेत.

Kirit Somaiya Allegations parab
Kirit Somaiya Allegations parab

मुंबई -महाविकास आघाडीमध्ये असलेले शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी आपल्या मंत्रिपदाचा वापर जनहितासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी करत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. मंत्री अनिल परब यांनी दापोली येथील मुरुड या भागामध्ये समुद्रकिनाऱ्यावर दहा कोटी खर्च करून बेकायदेशीरपणे बांधलेल्या रिसॉर्टबाबत भाजपचे नेते किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप लावले. सोमैय्या म्हणाले, हा रिसॉर्ट शेतजमिनीवर अनधिकृतपणे बांधलेला आहे. या सगळ्या प्रकरणा संदर्भात किरीट सोमैय्या यांनी स्थानिक जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे रीतसर कारवाईची मागणी केली होती, परंतु कोणतीच कारवाई स्थानिक प्रशासनाकडून होत नसल्यामुळे किरीट सोमैय्या यांनी थेट केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे या रिसॉर्ट संदर्भात तक्रार केली आहे.

भाजप नेते किरीट सोमैय्या
लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये नियमांची पायमल्ली करत अनिल परब यांनी शेतजमिनीवर रिसॉर्टचे बांधकाम केल्यामुळे त्यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी दापोली-मुरुड समुद्र किनार्‍यावर अनिल परब यांनी केलेल्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे देखील सादर केली असून त्यातल्या तरतुदीनुसार अनिल परब यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप केला. तसेच येत्या शुक्रवारी रत्नागिरीत जाऊन पोलीस तक्रार करणार असून सोमवारी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन अनिल परब यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी देखील करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
अनिल परब यांच्यावरती असलेले आरोप -
अनिल परब यांनी लॉकडाऊनच्या काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचे बांधकाम करून फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमैय्या यांनी यावेळी केलेला आहे. अनिल परब यांच्यावर मंत्रीपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाउनच्या नियमांना डावलून 2020 मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची मागणी आहे. अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणार्‍या विवान साठे यांच्याकडून दापोली-मुरुड समुद्र किनार्‍यावर जागा घेतली. एक कोटीमध्ये ही जागा घेतली. खरेदी खत शेतजमीन म्हणून झाले. सगळी कागदपत्रे शेतजमीन म्हणून आहेत, पण सातच दिवसात अनिल परब यांनी 16 जून 2019 ला ग्रामपंचायतीला पत्र लिहिले त्याता जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडल्याचे म्हटले. पण तो दाखला दाखवलेला नाही असे किरीट सोमैय्या यांनी यावेळेस म्हटले. यावेळी आरोप करताना त्यांनी संबंधित खरेदी खत आणि इतर कागदपत्रे देखील पत्रकार परिषदेत दाखवली. 7 मे 2019 रोजी तयार केलेल्या कागदपत्रात ही जागा अजूनही शेतजमीन आहे, पण आज त्या जागेवर प्रत्यक्षात हे रिसॉर्ट आहे. कोणतीही परवानगी न घेता सर्व नियमांची पायमल्ली करून लॉकडाऊन दरम्यान अनिल परब यांनी दहा महिन्यात रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण केले. 6 मे रोजी मी स्वतः दापोलीला रिसॉर्टवर जाऊन हा घोटाळा उघड केला. 11 मे 2019 ला अनिल परब यांनी बिनशेती जमिनीसाठी 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2019 च्या काळासाठी चार वर्षाचा टॅक्स तलाठ्याकडे भरला, असे किरीट सोमैय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Last Updated : May 19, 2021, 5:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details