मुंबई -उद्योगपती अंबानींच्या घराबाहेर स्फोटके भरलेली गाडी उभी करून मनसुख हिरेनच्या हत्या कटात ( Mansukh Hiren Murder Case ) माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याचा सहभाग असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी सचिन वाझे याने ४५ लाखांची सुपारी प्रदीप शर्माला दिल्याचा आरोप एनआयएने प्रतिज्ञापत्राद्वारे केल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी आता या प्रकरणात गप्प न राहता वाझेची पाठराखण करून महाराष्ट्राचा अपमान केल्याबद्दल जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
कुणाच्या इशाऱ्यावर हे सर्व? -“सचिन वाझे काही लादेन आहे का?” असा सवाल करत उपाध्ये म्हणाले की, वाझेची विधिमंडळात पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट उत्तर दिले पाहिजे. मनसुख हिरेन यांची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा याला ४५ लाखांची सुपारी दिल्याची व या कटाची आखणी पोलीस आयुक्तालयात झाल्याची केल्याची धक्कादायक माहिती एनआयएच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे. सचिन वाझेप्रमाणेच प्रदीप शर्मा हेसुध्दा शिवसेनेमध्ये होते. त्यांनी शिवसेनेतर्फे निवडणूकही लढवली होती. त्यांचे शिवसेनेच्या अनेक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध होते. त्यामुळे राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेशी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला हा गुन्हा अधिकच गंभीर आहे. त्यातच, हिरेनची हत्या करण्यासाठी सचिन वाझेने प्रदीप शर्मा यांना ४५ लाख रुपये दिल्याचीही माहिती समोर आली आहे. एका सामान्य पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा आला कुठून, याचाही शोध घेतला गेला पाहिजे. तसेच हे दोघे पोलीस अधिकारी कुणाच्या इशाऱ्यावर गंभीर कृत्ये करत होते हेही समोर आले पाहिजे, अशी मागणी उपाध्ये यांनी केली.