मुंबई : अवयव दानाचा(Organ Donation) संकल्प करुन आपण मृत्युनंतरही समाजाला अत्यंत उपयोगी ठरेल असे कार्य करु शकतो. या जगातून जाता-जाता आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करु शकतो. यासाठी गरज आहे ती अवयव दानाचा संकल्प करण्याची गरजआणि तो संकल्प सिद्धीस जावा, यासाठी आपले जवळचे नातेवाईक आणि मित्र यांना आपल्या संकल्पाची माहिती सोशल मीडियावरून द्यावी असे आवाहन के. ई. एम. रुग्णालयांचे अधिष्ठाता तथा ‘रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) केंद्राचे अध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.
National Organ Donor day : अवयव दान नोंदणी करुन 'डोनर कार्ड' सोशल मिडीयावर 'अपलोड' करण्याचे आवाहन - ROTTO SOTTO center KEM Hospital
२७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव दान दिनानिमित्त(National Organ Donor day) अवयव दान नोंदणी करावी. नोंदणीनंतर प्राप्त होणारे 'डोनर कार्ड' शक्य असल्यास आपल्या इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, इत्यादी 'सोशल मिडिया अकाउंट' वर जरूर अपलोड करावे, असे आवाहन डॉ. हेमंत देशमुख यांनी केले आहे.

राष्ट्रीय अवयव दान दिन
२७ नोव्हेंबरच्या राष्ट्रीय अवयव-दान- दिनानिमित्त महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये जाऊन अवयव-दान नोंदणी अवश्य करावी. अवयव-दान नोंदणी केल्यावर त्याबाबतची माहिती आपले जवळचे नातेवाईक व मित्र यांना सांगावी, तसेच नोंदणी केल्यावर प्राप्त होणारे 'डोनर कार्ड' शक्य असल्यास आपल्या इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्स-अप इत्यादी 'सोशल मिडिया अकाउंट' वर जरूर अपलोड करावे, जेणेकरून आपल्या अवयव दाता नोंदणीची माहिती आपल्या परिचितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल आणि एका सकारात्मक कार्याबाबत जनजागृती देखील साध्य होऊ शकेल, असे आवाहन अवयव-दान दिनाच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने डॉ. देशमुख यांनी केले आहे.
२० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी
रिजनल कम स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’ (ROTTO-SOTTO) च्या महाराष्ट्र राज्य व पश्चिम विभागाच्या केंद्र संचालक डॉ. सुजाता पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत सुमारे २० हजार दात्यांनी अवयव दानासाठी नोंदणी केलेली आहे. तर या केंद्राच्या समन्वयातून २०१७ पासून आतापर्यंत ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे ७८० व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), ४८० व्यक्तिंना यकृत (Liver), १३० व्यक्तिंना हृदय (Heart), ४३ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), ३ व्यक्तिंना आतडे (Intestine) तर ४ हात दान करण्यात आले आहेत. वायव्ही दान ५८० मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे १ हजार ४७५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहे.
२४२ दाते हे मुंबईतील
विशेष म्हणजे ५८० मेंदू मृत दात्यांपैकी २४२ दाते हे मुंबईतील आहेत. या २४२ दात्यांद्वारे सन – २०१७ पासून ३१९ व्यक्तिंना मूत्रपिंड (Kidney), १८५ व्यक्तिंना यकृत (Liver), ६७ व्यक्तिंना हृदय (Heart), २६ व्यक्तिंना फुप्फुसे (Lungs), ६ व्यक्तिंना स्वादुपिंड (Pancreas), एका व्यक्तिला आतडे (Intestine) आणि एका व्यक्तिला दुहेरी हात दान करण्यात आला आहे. याचाच अर्थ २४२ मेंदू मृत दात्यांद्वारे सुमारे ६०५ व्यक्तिंना अवयव-दान करण्यात आले आहेत, अशीही माहिती डॉ. पटवर्धन यांनी या निमित्ताने दिली आहे.