मुंबई - ऑक्सफर्ड विद्यापीठ निर्मित कोरोना लसीची आता दुसऱ्या टप्प्यात मानवी चाचणी होणार आहे. तर या मानवी चाचणीत मुंबई आता मोठी भूमिका बजावणार आहे. कारण आयसीएमआरने लसीच्या मानवी चाचणीसाठी मुंबई महापालिकेच्या नायर आणि केईएम रुग्णालयाची निवड केली आहे. त्यानुसार सोमवारी यासंबंधीचा प्रस्ताव रुग्णालयाच्या इथिक्स समितीसमोर ठेवला जाईल. याला मंजूरी मिळाल्यानंतर 160 स्वयंसेवक मिळवत आठवड्याभरात मानवी चाचणीला सुरुवात होईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
ऑक्सफर्डने 'कोविशिल्ड' नावाची लस तयार केली आहे. यात पुण्यातील सिरम कंपनीचा मोठा वाटा आहे. तर आता या लसीची मानवी चाचणी अमेरिका, ब्राझील आणि भारतात होणार आहे. त्यानुसार आयसीएमआरने कोरोना काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या मुंबईतील नायर आणि केईएम रुग्णालयाची निवड केली आहे. ही बाब पालिकेसाठी, मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. दरम्यान नायर आणि केईएममध्ये कोविशिल्ड लसीचे नमुने पोहोचले आहेत. तर आता लवकरात लवकर मानवी चाचणीला सुरुवात करायची असल्याने रुग्णालये तयारीला लागल्याची माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे. तर उद्याच यासंबंधीचा प्रस्ताव दोन्ही रुग्णालयाच्या इथिक्स समितीसमोर ठेवला जाणार आहे. या समितीच्या मंजुरी नंतर त्यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार आठवडयाभरात मानवी चाचणीला सुरवात होईल, असे काकाणी यांनी सांगितले.
160 जणांवर होणार ट्रायल..