मुंबई -सोशल मीडियावर खुलेआम अश्लील व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. या व्हिडिओंमुळे लहान मुलांवर परिणाम होत आहेत, बलात्काराच्या घटना वाढत आहेत, महिलांवर अत्याचार वाढत आहेत. यासाठी खलिफा या वेबसाइटवर आणि फेसबुकवरील अश्लील व्हिडिओविरोधात कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी सहा पोलीस आयुक्तांची भेट घेऊन केली आहे. आपण सध्या सामाजिक काम करत असून वेळ पडल्यास विधानसभा लढऊ, असेही त्यांनी म्हटले आहे.
'अश्लील व्हिडिओंवर कारवाई करा'
धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्या मीडियाशी बोलत होत्या. यावेळी बोलताना सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ प्रसारित केले जात आहेत. त्याचा परिणाम म्हणून महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित नाहीत. लोकांच्या डोक्यावर त्याचा परिणाम होत आहे. देशाची भावी पिढी त्यामुळे चुकीच्या मार्गावर जात आहे. मी गेले २५ वर्ष घरात होती. गेले दोन महिने घराबाहेर पडली आहे. यात मला जे दिसले त्यात लोक समाजसेवक म्हणवतात मात्र ते करत नाहीत. म्हणून मी समाजसेवा करण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्यावर झालेल्या अन्याया प्रकरणी कोर्टात केस सुरु आहे. कोर्टाने माझ्यावर बंधने घातली आहेत. म्हणून मी काही त्या प्रकरणी बोलणार नाही. पण लवकरच या प्रकरणी सर्व पुराव्यासह मी बोलेन असे करुणा शर्मा यांनी म्हटले आहे.
'...तर विधानसभा लढवेल'
पी उत्तर विभाग आहे यात १८ प्रभाग आहेत. या प्रभागात एकच स्वच्छता अधिकारी आहे. कोरोनामध्ये स्वच्छता ठेवण्याची गरज आहे. पंप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्वच्छ भारत अभियान हा नारा आहे. जीवन ज्योत भारत अभियान या आमच्या सामाजिक संस्थेद्वारे महापौरांना पत्र दिले आहे. आमच्या याच विभागात शौचालय तयार आहे, त्याचे उद्घाटन होत नाही, हे उद्घाटन झाले नाही तर दोन दिवसात मी स्वतःच त्याचे उद्घाटन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मी आधी सामाजिक काम करून आपली ओळख निर्माण करणार आहे. त्यानंतर निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी विधानसभेची निवडणूक लढवेल, अशी माहिती त्यांनी दिली.