मुंबई - मुंबईत ४ ऑगस्टला मुसळधार पाऊस पडला. यात सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले. याच पावसात एक हृदयस्पर्शी चित्र देखील मोठया प्रमाणात समाज माध्यमावर व्हायरल झाले. एक गरीब महिला आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात 7 तास भिजत पाण्याचा निचरा होण्यासाठी मेनहॉल उघडून गाड्यांना आणि लोकांना मार्ग दाखवत होती. याच महिलेशी संवाद साधला आहे, आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी.
कांता मूर्ती कल्लर हे नाव प्रसिद्ध व्यक्तीचे नाही, निदान कालपर्यंत तरी नव्हते. मुंबईत माटुंगा रेल्वे स्थानकाजवळच्या तुलसी पाईप रोडवर पदपथावर राहणारी ही महिला. व्यवसाय फुलविक्री. दादरला मिळणारी फुले आणून विकायची हा तिचा उद्योग. मुंबईत पडणाऱ्या पावसाने तिचे पदपथावरचे झोपडीवजा घर पाण्यात वाहून गेले. रस्त्यावरचे पाणी वाढत असल्याने तिने रस्त्यावरचे मॅनहोल उघडून पाण्याला वाट करून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, मॅनहोलवरचे झाकण उघडले आणि तिच्या लक्षात आले की झाकण उघडे राहिल्यास त्यात कोणीही पडून आपला जीव गमावू शकेल.यामुळे ही महिला भर पावसात त्या मॅनहोलजवळ उभी राहिली आणि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना, माणसांना सावध करू लागली. हा प्रकार दहा पंधरा मिनिटे नव्हे तर तब्बल सात तास सुरू होता, स्वतःचे घर वाहून जात असताना, स्वतःच्या दोन शाळकरी मुलींची चिंता असतांनाही लोकांच्या हितासाठी ती तिथेच उभ्या राहिल्या.कांता यांना आठ मुले आहेत. सहा मुलांची लग्ने झाली आणि ती आपापल्या संसारात लागली. अनुक्रमे आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या जानकी आणि तमिलश्री या दोन मुलींबरोबर त्या पदपथावर राहतात. पती आजारी असून ते स्वतंत्रपणे वाशी नका इथे राहतात. मॅनहोलपाशी सात तास उभे राहून, पाणी कमी झाल्यावर त्या त्यांच्या घरी परत आल्या तेव्हा ते 'घर' वाहून गेलेले होते. यातच दोन्ही मुलींच्या ऑनलाईन शिक्षणासाठी साठवलेले दहा हजार रुपयेही घरासोबत वाहून गेले.या धाडसासाठी खरे तर मुंबई महापालिकेने त्यांचे कौतुक करायला हवे होते. पण, कोणीही त्यांची दखल घेतली नाही. याबाबद्दल कांता यांनी खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, 'काय करू, एवढे पाणी वाढत होते, पण पालिकेचा एकही कर्मचारी आला नाही, शेवटी मी माझं काम केलं'. 'माझं आता काही लोकांकडून आभार व्यक्त होत आहे. पण गेल्या 40 वर्षांपासून माटुंगा रोड इथलं फुटपाथवरील घर आणि आपल्या आता सरत्या वयात मुलींच्या भविष्याची व घराची काळजी लागली आहे.