मुंबई - मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल केल्या जाणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे, आवश्यकता नसलेली जम्बो कोरोना केंद्रे बंद करून तेथील साहित्य पालिकेच्या इतर रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. दहिसर येथील कोविड सेंटर पाठोपाठ कांजुरमार्ग येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. तेथील ऑक्सिजन प्लांट मुलुंड जकात नाका येथील जागेत हलवला जाणार आहे.
हेही वाचा -ख्वाजा युनूस मृत्यू प्रकरण; राज्य सरकारकडून तब्बल 13 वर्षांनी विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती
कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने बंद -मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाला. गेल्या अडीच वर्षात कोरोना विषाणूच्या तीन लाटा आल्या. या तीनही लाटा आटोक्यात आल्यावर रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. मात्र, मे महिन्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रसार सुरू झाल्यावर रुग्णालयातील खाटा कमी पडू लागल्याने जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात आले. या कोविड सेंटरच्या देखभालीवर कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. सध्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी केवळ १.९२ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे पालिकेने गोरेगाव, दहिसर, कांजूरमार्ग आणि मुलुंड येथील कोविड सेंटर टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.