मुंबई - उशिरानं का होईना पण कंगना रणौतचा चित्रिकरणासाठी परदेशवारीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्ह आता दिसू लागली आहेत. कंगना रणौतची पासपोर्ट नूतनीकरणासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयकडून आज सोमवारी निकाली काढण्यात आली. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली.
कोर्टात काय झाले -
पासपोर्ट नूतनीकरणासाठीचा फॉर्म भरताना तिथल्या अधिकाऱ्यांनी तोंडी आक्षेप नोंदवलाय या कारणासाठी हायकोर्टात दाद कशी काय मागितली जाऊ शकते?, पासपोर्ट प्राधिकरणानं काही लेखी आक्षेप नोंदवलाय का? अशी विचारणा यावेळी हायकोर्टाकडून करण्यात आली होती. 'याप्रकरणी नियमावलीनुसार लवकरात लवकर तोडगा काढू', असे पासपोर्ट प्राधिकरणाच्या वतीने हायकोर्टात आश्वासन देण्यात आले. कंगनाच्यावतीनं तिचे वकील रिझवान सिद्धिकी यांनी चित्रिकरण रखडत असल्याचं कारण कोर्टापुढे मांडलं होतं. तसेच कंगनाविरोधात कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. मुंबई पोलिसांकडून वांद्रे पोलीस स्थानकांत कंगनाविरोधात 'देशद्रोह' प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाकडनं कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप घेण्यात आला आहे. याप्रकरणी हायकोर्टानं कंगनाला सध्या अटकेपासून दिलासा दिलेला आहे.