मुंबई :महानगरपालिकेने कंगना रणौतला 'स्टॉप वर्क नोटीस' पाठवली आहे. तिच्या ऑफिसच्या परिसरात कोणतेही अधिकृत वा अनधिकृत बांधकाम सुरू नाहीये. त्यामुळे, हे काम थांबवण्यासाठीची नोटीस देण्याची काहीही गरज नव्हती. हे अतिशय चुकीचे असून, केवळ सूडबुद्धीने ही नोटीस पाठवण्यात आली आहे. राज्य सरकार हे केवळ आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहे, असा आरोप कंगना रणौतच्या वकिलांनी केला आहे.
तर कंगनाच्या वकिलांचे आरोप हे चुकीचे असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. कंगनाला याआधीही आम्ही नोटीस दिली होती. तरीही तिच्या ऑफिस परिसरातील अनधिकृत बांधकाम सुरूच ठेवण्यात आले. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. तसेच, याआधीच्या नोटीसला कंगनाने उत्तर न दिल्यास कार्यालयावरील कारवाईस तीच जबाबदार राहणार आहे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले होते. तिने तरीही, या नोटीसला उत्तर दिले नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे.