मुंबई - कंगना रणौतला ड्युअल पर्सनॅलिटी आहे, तिला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. ती केवळ अभिनेत्री असून तिला दिलेल्या स्क्रिप्टनुसार ती वागते. अशा कित्येक कंगना आल्या आणि गेल्या, अशी खोचक टीका शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी कंगनावर केली. "कंगनाला मुंबईबद्दल वाईट बोलत असेल, तर आम्ही ऐकून घेणार नाही. आपलं बस्तान तिने उचलावं हेच योग्य ठरेल आणि मुंबई तिला पाकव्याप्त काश्मीर वाटत असेल, तर तिने योग्य वाटतं असेल तिथं रहावे", असा सल्ला परब यांनी कंगनाला दिला.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अभिनेत्री कंगना रणौतला भेट दिल्यानंतर नवा वाद उफाळून आला आहे. "बेकादेशीर कामे करणाऱ्यांना राज्यपाल भेटत असतील तर फक्त कंगनाला का भेटता? बेकायदा बांधकामं तुटलेल्या सामान्य लोकांनाही भेटावं. तिचं बांधकाम तुटल्यावर इतका का पोटशूळ?”, अशी टीका परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यपालांवर केली आहे.
उद्धव ठाकरेंचे व्यंगचित्र शेअर केल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एका नौदल अधिकाऱ्याला मारहाण केली होती. यावर, "नौदल अधिकारी असला म्हणून, काय काहीही करण्याचा अधिकार त्यांना नाही. आमच्या देवा समान नेत्यांवर चिखलफेक होत असेल तर शिवसैनिक सहन करू शकत नाहीत, शिवसेना मारहाणीचे समर्थन करत नाही, पण ती सैनिकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती" असे स्पष्टीकरण परिवाहन मंत्री अनिल परब यांनी दिले आहे.