महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

JeeneDoCampaign: गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे - डॉ. निलम गोऱ्हे - निलम गोऱ्हे प्रतिक्रिया

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आणि एक राजकारणी म्हणून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

डॉ. निलम गोऱ्हे
डॉ. निलम गोऱ्हे

By

Published : Aug 6, 2021, 9:21 PM IST

मुंबई - गोव्यातील बीचवर झालेल्या दोन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पालकांना दोषी ठरवले आहे. याचे पडसाद देशभरात उमटले आहे. याबाबत बोलताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आणि एक राजकारणी म्हणून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिली आहे. तर शासन, प्रशासन आणि सर्वच जण महिलांबाबत सुरक्षेतेची भावना निमार्ण करण्यात कमी पडत आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या वर्षा विद्या विलास यांनी दिली आहे.

विधानसभेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे

महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे वक्तव्य -

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करणारे आणि एक राजकारणी म्हणून अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केले आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पालकांना जबाबदार धरले आहे. वास्तविक पाहता ज्या महिला मुली घराबाहेर पडतात त्या आपल्या जबाबदारीवर बाहेर पडतात. त्यांच्यासोबत कुटुंबीय, स्नेही यापैकी कोणीतरी असते. मुलींवर महिलांवर चांगले संस्कार झालेले आहेत. अशा वेळी प्रमोद सावंत यांचे विधान चुकीचे आहे. याबाबत राष्ट्रीय महिला आयोग आणि नॅशनल वुमन्स राईट कमिशन यांना पत्र लिहून याबाबत तक्रार करणार असल्याची माहिती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

महिलांची माफी मागावी -

२५ जुलैला गोव्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे की शासन, प्रशासन आणि सर्वच जण महिलांबाबत सुरक्षेतेची भावना निर्माण करण्यासाठी कमी पडत आहे. त्या घटनेनंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले विधान हे तर पूर्णपणे निषेधार्थ आहे. मायबाप सरकारचे कर्तव्य राज्यातील सर्वच महिला, युवती यांना सुरक्षा प्रदान करणे हे आहे. पुरुषसत्ताक व्यवस्था आजही आहे, हे त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. स्त्री घराबाहेर पडली की तिच्यावर लैंगिक अत्याचार होणार, असे कुठेतरी बोलायचा प्रयत्न हा त्यांच्या विधानातून होताना दिसतो आहे. याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो. राज्यकर्ता म्हणून त्यांना हे शोभत नाही. त्यांनी देशातील सर्व महिलांची, मुलींची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी वर्षा विद्या विलास यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण?

२५ जुलैला गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामुहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गोव्याच्या विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या घटनेबद्दल मुलींच्या आईवडिलांनाही दोष दिला होता. 'रात्री अपरात्री मुलींना बाहेर सोडताना आईवडिलांनी विचार करायला हवा. केवळ सरकार आणि पोलिसांना दोष देऊन चालणार नाही. १४-१५ वर्षांच्या मुली रात्रभर बीचवर थांबत असतील तर पालकांनी विचार करण्याची गरज आहे. अल्पवयीन मुलांना बाहेर सोडताना पालकांनीही जबाबदारी घ्यावी,' असे त्यांनी म्हटले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details