मुंबई -आपल्या देशातील नागरिकांना लस प्रथम मिळायला पाहिजे. मात्र देशात लसीचा तुटवडा असताना, केंद्र सरकारला पाकिस्तान आणि इतर देशांना लस देण्याची काय घाई आहे? असा प्रश्न जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे. समन्वय समितीच्या बैठकीनंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या देशातील नागरिकांना लस दिल्यानंतर मानवतेच्या दृष्टिकोनातून इतर देशांचा विचार करणेही आवश्यक आहे. मात्र केंद्र सरकार सध्या तरी तसं करताना दिसत नाहीय. सध्या कोरोना प्रतिबंधक लस ही पाकिस्तान आणि इतर देशांना पोहोचवली जात आहे. त्या देशांना देखील मदत केली पाहिजे, परंतु सर्वप्रथम केंद्राने आपल्या देशातील नागरिकांच्या गरजा लक्षात घ्याव्यात.