मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम ( nagarpanchayat nagarparishad election ) जाहीर केला आहे. यावरती आता राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेक्षाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या निवडणुकांवर आक्षेप घेतला आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणे म्हणजे बहुसंख्य ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नयेत या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
ट्विट करत जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सर्वोतोपरीने प्रयत्न करत आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळसाहेब पहिल्या दिवसापासून स्वतः यामध्ये जातीने लक्ष घालत आहेत. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या बांठिया आयोगाने इम्पिरिकल डाटा गोळा करून अहवालही तयार केला आहे.