मुंबई - शहरातील रुग्णसंख्या वाढत असताना आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्सची कमतरता भासत आहे. रुग्णांना बेड्स मिळावे आणि त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून पालिकेने खासगी रुग्णालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने जसलोक या सुपर स्पेशालिटी खासगी रुग्णालयाला पूर्णपणे कोरोना रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ४० आयसीयूसह २५० बेड वाढणार असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.
बेड्स वाढणार -
मुंबईत गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर, रुग्णांना बेड कमी पडू नयेत, यासाठी पालिका रुग्णालये, जम्बो रुग्णालयांतील बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांचे 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात आले आहेत. लक्षणे नसलेल्या आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांबरोबर टायअप करत पंचतारांकित हॉटेल्समध्ये उपचारांची सुविधा सुरू केली आहे. दरम्यान, बीकेसीतील ट्रायडंटमध्ये रिलायन्स रुग्णालयाच्या मदताने २० बेड आणि मरीन ड्राईव्ह येथील इंटर काँटिनेंटल हॉटेलमध्ये बॉम्बे रुग्णालयाच्या मदतीने २२ बेड आजपासून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्याचबरोबर आजपासून सेव्हन हिल्समध्ये ३० आयसीयू बेड उपलब्ध झाले असून येत्या आठवडाभरात नेस्को कोरोना केंद्रात १५०० ऑक्सिजन बेड्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली.