महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पेट्रोल-डिझेल दरवाढ: सरकारकडून सर्वसामान्यांची लूट, जनता दलाचा आरोप

केंद्र सरकार सूट-बूटवाल्यांसाठीच काम करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सलग 8 दिवस वाढणाऱ्या किंमतीवरून हे स्पष्ट झाले आहे. सरकार सर्व सामान्यांची लूट करत आहे असा आरोप जनता दल सेक्युलरने केले आहे.

Janata Dal criticizes government over petrol-diesel price hike
पेट्रोल-डिझेल दरवाढ: सरकारकडून सर्वसामान्यांची लूट

By

Published : Jun 14, 2020, 8:29 PM IST

मुंबई -केंद्र सरकार सूट-बूटवाल्यांसाठीच काम करत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या सलग 8 दिवस वाढणाऱ्या किंमतीवरून हे स्पष्ट झाले आहे. सरकार सर्व सामान्यांची लूट करत आहे असा आरोप जनता दल सेक्युलरने केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढवीत असताना विमानाचे इंधन असलेल्या 'एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या (एटीएफ) किंमतीत एकदाही वाढ करण्यात आलेली नाही नसल्याचे जनता दलाने म्हटले आहे.


जानेवारी 2020 पासूनच कोरोनाच्या साथीची चर्चा सुरू झाली. परिणामी जगभरच लॉकडाऊन होऊन वाहतूक बंदी, उत्पादन बंदी सुरु झाली. परिणामी जगभर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती कोसळल्या व एक वेळ अशी आली की कच्च्या तेलाच्या किंमती शून्यावर वा त्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही खाली आल्या. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने एक पैशाचाही लाभ भारतीय जनतेला मिळू दिला नाही. उलट दोन्ही पदार्थांवरील करात मोठ्या प्रमाणावर वाढ करून स्वतःचा खजिना भरण्याची सोय केली. मात्र, हाच निकष एव्हिएशन टर्बाइन फ्युएल अथवा एटीएफला लावण्यात आला नाही.


फेब्रुवारी महिन्यात पेट्रोल व डिझेलची किंमत अनुक्रमे ७७. ५६ रुपये व ६७.८० रुपये एवढी होती तर एटीएफची किंमत ६४ हजार ३२३.७६ रुपये किलोलीटर ( ६४.३२ रुपये लीटर) होती. पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती घसरू लागताच २१ मार्च रोजी एटीएफच्या किंमतीत पहिली मोठी कपात करण्यात आली. 12 टक्‍क्‍यांनी किंमती कमी करण्यात आल्या. तीन मे रोजी पुन्हा 23 टक्क्यांनी कपात करण्यात आली. अशी एकूण सहा वेळा कपात करण्यात आली. परिणामी मे अखेरीस विमानाच्या इंधनाच्या किंमती अवघ्या २२.५४ रुपये लिटरवर आल्या होत्या.
वास्तवात अशीच घट पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत झाली होती. मात्र, मोदी सरकारने करात वाढ करण्याचा सपाटा लावून आपले खिसे भरण्याचे काम केले. मार्च महिन्याच्या मध्यावर अबकारी करात पहिल्यांदा मोठी वाढ करण्यात आली. मे महिन्यात तर डिझेलवरील अबकारी करात 13 रुपयांनी तर पेट्रोलवरील अबकारी करात दहा रुपयांनी वाढ करण्यात आली.


फेब्रुवारी महिन्यापर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील करांचे प्रमाण अनुक्रमे १०७ टक्के आणि ६९ टक्के होती. मे मध्ये हे प्रमाण तब्बल 260 टक्के आणि 256 टक्‍क्‍यांवर गेले. या संपूर्ण काळात विमानाच्या इंधनाच्या किमतीवर सरकारने कोणताही कर लावला नव्हता, त्यामुळे या इंधनाच्या किंमती पेट्रोलचा तुलनेत १/३ इतक्या खाली गेल्या होत्या.

देशातील लाॅकडाऊन उठवायला सुरूवात केल्यानंतर पहिल्यांदा विमानाच्या इंधनाच्या किंमतीत सरकारने मोठी वाढ केली. तरीही 1 जूनपासून त्याची मुंबईतील किंमत केवळ ३३ रुपये लीटर आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जागतिक पातळीवर तेलाचे दर वाढू लागल्याने सलग आठ दिवस पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ करण्यात येत आहे. (त्यामुळे महागाईत सार्वत्रिक वाढ होणार आहेच) त्यामुळे पेट्रोलची किंमत मुंबईत ८२. ७० रुपये तर डिझेलची किंमत ७२. ६४ रुपये एवढी झाली आहे. जागतिक पातळीवर पेट्रोलियम पदार्थांच्या किंमती 55 डाॅलर प्रती बॅरल होत्या. त्यावेळी मुंबईत पेट्रोल 75 रुपयांना तर डिझेल 65.19 रुपये दराने उपलब्ध होते. आता पेट्रोलियम पदार्थांच्या किमती 39 डाॅलरवर असताना मुंबईकरांना पेट्रोल ८२.७० रुपये तर डिझेल ७२.६४ रुपयांना विकत घ्यावे लागत आहे. विमानाचे इंधन मात्र त्याच्या निम्म्याहून कमी किंमतीत म्हणजे 33 रुपये लिटरने उपलब्ध आहे असे जनता दल सेक्युलरचे प्रवक्ते प्रभाकर नारकर यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details