मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेला संबोधित केले. देशभरात कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे लॉकडाऊन लागू करणे हे चुकीचे होते, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. त्यामुळेच आता अचानक लॉकडाऊन काढणेही योग्य नाही, म्हणून आपण टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढून घेणार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. यासोबतच पावसाळाही तोंडावर आला आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा प्रसार होण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे आपल्याला आता जास्त खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे ठाकरे यावेळी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशभरात लॉकडाऊन लागू केला होता. हा लॉकडाऊन नंतर वाढवण्यात आला. सध्या देशात लॉकडाऊनचा चौथा टप्पा लागू असून, ३१ मेपर्यंत तो लागू असणार आहे. याबाबत बोलताना ठाकरे यांनी पंतप्रधानांवर टीका केली. देशात अचानकपणे लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय चुकीचा होता, असे ते म्हटले.
केंद्राकडून महाराष्ट्राला मिळणारी थकीत जीएसटी रक्कम अद्याप मिळाली नाही. तसेच, स्थलांतरीत कामगारांसाठी चालवण्यात येणाऱ्या रेल्वेंच्या खर्चाचा केंद्राकडून मिळणारा निधीही अद्याप राज्याला मिळाला नाही. यासोबतच, औषधे आणि पीपीई किट्सचा आवश्यक तेवढा पुरवठा करण्यातही केंद्र अपयशी ठरत असल्याचे ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.