मुंबई -'जलयुक्त शिवार योजने'तील तांत्रिक अडचणीमुळे राज्यामध्ये महापूर येत असल्याचे वक्तव्य एका पर्यावरण तज्ज्ञांनी केले होते. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या वक्तव्याचे खंडन केले आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या तांत्रिक अडचणीमुळे राज्यामध्ये पूर आलेला नाही. या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला. मात्र, या योजनेमुळे महापूर आला असे म्हणणे म्हणजे हास्यास्पद असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही वाचा -दिवाळीनंतर महाविद्यालय होणार सुरू, पण... - मंत्री उदय सामंत
नदीपात्रातील झालेल्या कामांचा प्रश्न या महापुरामुळे समोर आला आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी अनेक समित्या नेमल्या गेल्या. मात्र, या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदाच झाल्याने शेतकरी आनंदीत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
- फडणवीस 2 ऑक्टोबरला करणार पाहणी -
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दोन ऑक्टोंबरला मराठवाडामध्ये आलेल्या महापुराची पाहणी करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. पहिल्यांदा विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मराठवाड्यामधील पूर परिस्थितीचा आढावा फडणवीस येणार आहेत. पूरग्रस्तांना मदत करण्याची वेळ आल्यास राज्य सरकार केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवत असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.
- देगलूर पोटनिवडणुकीसाठी भाजपची रणनीती -
देगलूर विधानसभा पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला होणार आहे. यासाठी भाजपकडून योग्य ती तयारी करण्यात आली आहे. यासाठी चार ऑक्टोबरला भाजपकडून देगलूरमध्ये मोठी सभा घेतली जाणार आहे. या सभेसाठी आमदार आशिष शेलार, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी या मतदारसंघात बारा जणांची नावे पुढे आली होती. चार तारखेला होणाऱया सभेमध्ये उमेदवाराचे नाव घोषित करणार असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
हेही वाचा -मरोळ मरोशीत मेट्रो चाचणी: आरेतील एकाही वृक्षाला धक्का लावू नका- मुख्यमंत्र्यांचे निर्देश