मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संप आणि संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. मात्र, तरीही राज्य सरकार कोणतीही मदत करू इच्छित नाही. आणि तोडगाही काढू इच्छित नाही, असा आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मागण्या तसेच इतर अन्य मागण्यांसंदर्भात चर्चा करून निर्णय घेणे शक्य आहे. एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करणे अनिवार्य आहे. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्न संदर्भात नियोजन करून मार्ग काढता येणेही शक्य आहे. मात्र, राज्य सरकारला यामध्ये स्वारस्य दिसत नाही. एसटी कर्मचाऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा दिलासा द्यायचा नाही अशीच सरकारची भूमिका आहे, असा आरोप दरेकर यांनी केला आहे.
खाजगी बस वाल्यांना मलिदा देण्यासाठी खटाटोप - दरेकर
दरम्यान, राज्यातील खाजगी बस धारकांना राज्य सरकारने या निमित्ताने प्रवासाची परवानगी आणि परमिट दिले आहे. कामगारांच्या मागण्या मान्य करून संप मोडीत काढणे शक्य आहे. राज्य सरकार कोणत्याही पद्धतीची पावले उचलत नाही. त्यामुळे खाजगी बस धारकांना मलिदा मिळावा यासाठीच हा सर्व खटाटोप आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतो अशी शंकाही दरेकरांनी उपस्थित केली आहे.