पुणे - मागील पाच वर्षांत भाजपा सरकारच्या काळात महावितरणचे 67 हजार कोटी रुपये थकले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रावर संकट ओढावल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपाने हे मोठे संकट आणले आहे. मात्र महाविकास आघाडी सरकार यातून मार्ग काढेल, असे ते म्हणाले. वीजबिलावर निर्णय घ्यायला सरकारला एवढा वेळ का लागतोय, असा प्रश्न विचारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या काळात थकबाकी कशी वाढली याचा अभ्यास करायला वेळ द्या, असे जयंत पाटील म्हणाले.
ऊर्जा मंत्र्यांची कोंडी होत आहे. तसेच काँग्रेसला डावलले जात असल्याचा अपप्रचार भाजपाकडून केला जातोय. त्याकडे कोणीही गांभीर्याने पाहू नये, असे ते म्हणाले. युती सरकारवेळी भाजपाने शिवसेनेला अशीच वागणूक दिली असेल. मात्र आमचे मुख्यमंत्री कोणताही दुजाभाव करत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
जयंत पाटील पुण्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील महा विकासआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेस भवनात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक घेतली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे पदवीधर संकटात
देशाची अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे पदवीधरांसमोर मोठे संकट आहे. पदवीधरावर कोरोनाच्या आधीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे संकटात आले. त्यामुळे महाआघाडीचे उमेदवार पदवीधरांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली.