महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

रेमडेसिवीरच्या खरेदीवरून पालिकेला बदनाम करण्याचा डाव - पालिका आयुक्तांची भाजपवर टीका - मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल

रेमडेसिवीर इंजेक्शन पालिका चढ्या दरात घेत असून त्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक व पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला होता. या आरोपाबाबत पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे खुलासा केला आहे.

Iqbal singh Chahal
पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल

By

Published : Apr 16, 2021, 2:28 AM IST

मुंबई -कोरोनापासून वाचण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकतेच्या प्रमाणात खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी २ लाख इंजेक्शनची ऑर्डरही देण्यात आली आहे. बाजार भावाप्रमाणे त्याची खरेदी केली जात आहे. मात्र काही विघ्नसंतोषी घटक रेमडेसिवीरची खरेदी जास्त दरात करून घोटाळा केल्याचा आरोप करून पालिकेला बदनाम करत असल्याचा आरोप पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी भाजपाचे नाव न घेता केला आहे.

गेल्या दोन महिन्यात मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. कोरोना वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. हे इंजेक्शन पालिका चढ्या दरात घेत असून त्यात घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नगरसेवक व पालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केला होता. या आरोपाबाबत पालिका आयुक्तांनी पत्राद्वारे खुलासा केला आहे.

हेही वाचा-कोरोना महामारीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करा; मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

रेमडेसिवीर देण्यासाठी एकाच कंपनीकडून समर्थता-

कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह मोहिमा राबवण्यात येत आहेत. त्याचबरोबर योग्य ते उपचार वेळेत करण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची काळजीही पालिकेकडून घेतली जात आहे. यासाठी हाफकिन इन्स्टिस्टयूटच्या माध्यमातून १ एप्रिल २०२१ ला ५७ हजार १०० रेमडेसिवीरचे डोस प्रत्येकी ६६५ रुपयांप्रमाणे खरेदी करण्याची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, कोणत्याही पुरवठादार कंपनीने या दरात पालिकेला रेमडेसिवीरचा साठा पुरवण्यात रस दाखवला नाही. सिप्ला कंपनीकडे नोंदवण्यात आलेली १० हजार रेमडेसिवीरची मागणीही पूर्ण करण्यास कंपनीने असमर्थता दर्शवली. त्यामुळे पालिकेने मायलन या कंपनीकडे तातडीने ७ एप्रिलला २ लाख रेमडेसिवीरची मागणी नोंदवली. मात्र, पुरवठा कमी असल्याचे कारण पुढे करत प्रत्येक डोससाठी जीएसटीसह १,५६८ रुपये आकारण्यात येईल आणि त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे कंपनीने स्पष्ट केल्याचे चहल यांनी सांगितले.

हेही वाचा-कोरोनाचा रेल्वेला फटका : प्रवासी नसल्याने राज्यांतर्गत 3 विशेष एक्स्प्रेस गाड्या रद्द

देशभरात रेमेडेसिवीरचे एकच दर, २५ हजार साठा उपलब्ध -
मायलन लॅबोरेटरीज या कंपनीकडून रेमेडेसिवीरची मुंबई महापालिकेने खरेदी नोंदवली आहे. ती कंपनी देशभरात प्रत्येक डोससाठी १ हजार ५६८ या एकाच दराने पुरवठा करते. मुंबई महापालिकेसह देशातील ६ ठिकाणांवरून रेमडेसिवीरची मागणी कंपनीकडे करण्यात आली आहे. यात सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सातारा जिल्हा रुग्णालय, मध्य प्रदेश वैद्यकीय शिक्षण आयुक्त, आसाम, नवी मुंबई महानगरपालिका आणि गुजरात मेडिकल सर्व्हिस कॉर्पोरेशन लिमिटेड यांनीही या कंपनीकडे खरेदी नोंदवली आहे. त्यांनाही कंपनी याच दराने रेमडेसिवीरचा पुरवठा करणार आहे. मुंबईकरांच्या सुदैवाने या २ लाख डोसपैकी २५ हजार डोसचा साठा कंपनीने मुंबई महापालिकेला तातडीने पाठवला आहे, अशी माहिती पालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी दिली.

पालिकेला बदनाम करण्याचा डाव -
मुंबई महापालिकेचे बाजू ऐकून न घेता काही विघ्नसंतोषी घटक रेमडेसिवीरसाठी नोंदवलेल्या खरेदीवरून पालिकेची नाहक बदनामी करत आहेत. पालिका ही खरेदी जास्त किमतीने करत आहे, असे चित्र मीडियाच्या माध्यमातून रंगवले जात आहे. मात्र, हे खरे नाही, हे यावरून स्पष्ट दिसून येत आहे. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी पालिका नेहमीच अग्रस्थानी राहिली आहे आणि राहणार, असा विश्वास पालिका आयुक्त चहल यांनी पत्रातून व्यक्त केला आहे.

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे 8 हजार 217 नवे रुग्ण तर 49 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत गेल्या काही दिवसांत 8 ते 11 हजारांच्यावर रुग्ण आढळून येत आहेत. त्यात गेले दोन दिवस घट झाली होती. सोमवारी, मंगळवारी रुग्णसंख्येत घट झाली होती. काल 14 एप्रिलला त्यात वाढ होऊन 9 हजार 925 नवे रुग्ण आढळून आले होते. आता त्यात पुन्हा घट होऊन 8 हजार 217 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज (गुरुवारी) 10 हजार 97 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असल्याने नव्या रुग्णापेक्षा डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details