मुंबई -आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग (IPS rashmi Shukla phone tapping case) प्रकरणात आज (दि.14) रोजी मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात केंद्र गृह विभागातर्फे दाखल अर्जावर सुनावणी होणार होती. परंतु काही कारणास्तव सरकारी वकील गैरहजर राहिल्याने सुनावणी 21 जानेवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी हे पुरावे केंद्रीय गृहमंत्रालयाकडे दिले होते. ही कागदपत्रे आणि पेन ड्राइव्ह १० दिवसांत तपासासाठी मुंबई पोलिसांना सोपवण्याचे आदेश महानगर दंडाधिकारी न्यायालयाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिले होते. मुंबई सायबर सेल कडून या प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे प्रमुख साक्षीदार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. तसेच तपासासाठी त्यांचा जबाब नोंदवणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
पोलीस दलात बदल्याचा घोटाळा
राज्यातील पोलिस दलातील बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी ज्या माहितीच्या आधारे केला होता. सायबर विभागाने या फोन टॅपिंग अहवाल लीक प्रकरणात देवेंद्र फडणवीस हे आपले प्रमुख साक्षीदार असल्याची माहिती कोर्टाला दिली आहे. IPS अधिकारी रश्मी शुक्ला ह्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना राज्यातील पोलिस दलात बदल्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या संशयाने काही नेते आणि एजन्ट्सचे फोन टॅप करण्यात आले होते. याचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी तयार केला होता. पण अहवाल गुप्त असतानाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तसेच यासंदर्भातली सर्व कागदपत्रं आपण केंद्रीय गृहमंत्रालयाला देणार असल्याचे जाहीर केले होते.
हेही वाचा -SSB Jawan Died Bihar : बिहारमध्ये विजेचा शॉक लागून तीन जवानांचा मृत्यू; महाराष्ट्रातील एकाचा समावेश