मुंबई - काही दिवसांपूर्वी संपूर्ण मुंबईमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यावरून आता राजकीय आरोप -प्रत्यारोप रंगतांना दिसत आहेत. आता भाजप नेते आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहेले आहे. या पत्रामध्ये मुंबईतील वीजपुरवठा खंडीत व्हायला कोण जबाबदार आहे? त्याची चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलीये.
शेलार यांनी या पत्रात म्हटलं आहे की, मुंबईसह एमएमआरमध्ये खंडित झालेला वीजपुरवठा हा घातपाताचा प्रकार असून ऊर्जा खात्याला काही लोक बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे वारंवार ऊर्जा मंत्री म्हणतायेत. यावर कोण या खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे ? त्याची तपास यंत्रणामार्फत चौकशी करा. पुढे या पत्रात म्हटले आहे की, अचानक मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह पालघरपर्यंतच्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्याने एक अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थी, प्रवासी, रूग्ण यांच्यासह नागरिकांचे अतोनात हाल झाले. तसेच मुंबई सारख्या देशाच्या आर्थिक राजधानीच्या सर्व सेवा अचानक कोलमडल्याने याबाबत सर्वदूर बदनामी तर झालीच, तसेच मोठे नुकसान ही झाले. त्यामुळे ही बाब अत्यंत गंभीर असून, या घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत. सरकारने त्याचे उत्तर द्यावे. हा प्रकार घातपात असवा असा संशय खुद्द उर्जा मंत्री व्यक्त करत आहेत. त्यामुळे याची गंभीरता अधिकच वाढते, त्यामुळे सरकारने या प्रकाराची चौकशी करावी.