मुंबई - महाराष्ट्र राज्य अस्थिर करण्यासाठी राज्याबाहेरून काही गुंड आणून महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा डाव सुरू असल्याची खात्रीलायक माहिती असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. विविध सणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. त्यासाठी महाराष्ट्राबाहेरून गुंड आणून दंगल घडविण्याचा डाव असल्याची खात्रीलायक माहिती आपल्याकडे आली आहे, असा दावा शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
कायद्यानुसारच राज यांच्यावर गुन्हा दाखल :- राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्यावर औरंगाबाद येथील सभेत चिथावणीखोर भाषण दिल्याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र असे गुन्हे कायद्यानुसारच दाखल होतात. जर एखादी व्यक्ती चिथावणीखोर भाषण करून जनतेच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदा व सुव्यवस्था बिघडवली या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. हे यापूर्वी अनेकदा झाले आहे, त्यामुळे यात काही नाविन्य नाही, असेही राऊत यांनी सांगितले.