मुंबई - आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत निर्मला सितारामन यांनी आज दुसऱ्यांदा पत्रकार परिषद घेत योजनांची घोषणा केली. यावेळी स्थलांतरीत मजूर, मुद्रा लोन, फेरीवाले, आदिवासी आणि लहान शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या. यासोबतच 'एक देश एक रेशन कार्ड' या योजनेचीही घोषणा करण्यात आली. या योजनेमुळे एकाच रेशन कार्डचा वापर देशभरात कोठेही करण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
'वन नेशन वन नेशन' याचा सामान्यांना काय फायदा होईल, त्याची का गरज होती तसेच याची अंमलबजावणी करताना कोणत्या अडचणी येऊ शकतात याबाबत 'ईटीव्ही भारत'ने गोरख आव्हाड यांच्याशी चर्चा केली आहे. आव्हाड हे रेशनिंग कृती समिती कार्यकर्ते, आणि इंटिग्रेटेड सस्टेनेबल नॉलेज अॅन्ड रिसर्च अकॅडमीचे सेक्रेटरी आहेत.
ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी सांगितले, की ही योजना अतीशय चांगली, आणि गरजेची आहे. रेशनिंग कृती समितीतर्फे या योजनेचे स्वागत आम्ही करतो आहोत. यामुळे आपण ज्याप्रमाणे देशभरात एटीएममधून पैसे काढतो, त्याप्रमाणे एका नागरिकाला देशभरात कोठेही रेशन उपलब्ध होऊ शकेल.