मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे आधुनिकीकरण पूर्ण होवून त्यात एकापाठोपाठ आकर्षणाची भर पडते आहे. राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार या प्राणिसंग्रहालयात वेगवेगळी वैशिष्ट्ये समाविष्ट केली जात आहेत. बच्चे कंपनी आणि पर्यटकांचे राणीबाग हे आवडते ठिकाण. याच राणीबागेत ( Ranibagh Mumbai ) आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय ( International standard aquarium ) उभारले जाणार आहे. घुमटाकार प्रवेश मार्ग आणि बोगद्यासारख्या गोलाकार स्वरूपाच्या या मत्स्यालयातून चालताना समुद्रात शिरून मत्स्यजीवन आणि जलवैविध्य न्याहाळत असल्याचा अनुभव मिळणार आहे. यामुळे आगामी काळात हे मत्स्यालय पर्यटकांसाठी निश्चितच मोठे आकर्षण ठरणार असल्याची माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालय : पेंग्विन प्रदर्शनी सुरू झाल्यानंतर पर्यटकांची प्राणिसंग्रहालयात रोज मोठी झुंबड उडते आहे. सोबतीला नव्याने दाखल झालेले विविध वन्य पशुपक्षी, प्राणी याठिकाणी पाहायला मिळत असल्याने पर्यटकांसाठी येथील रपेट ही नेहमीच पर्वणी ठरत आली आहे. पर्यटक, निसर्गप्रेमी आणि खास करून लहान मुले व विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महानगरपालिकेने आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मत्स्यालयाची उभारणी करण्याचे निश्चित केले असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मत्स्यालयाची निर्मिती करताना इंटरप्रिटेशन इमारत, पेंग्विन कक्ष यासह परिसरातील प्रसाधनगृहे व आवश्यक त्याठिकाणी अतिरिक्त सुविधांचा देखील विस्तार आणि विकास केला जाणार आहे. मत्स्यालय बांधणीच्या निविदेमध्ये या कामांचा समावेश केला आहे. त्यामुळे सध्याच्या पेंग्विन कक्षासह इतर सुविधांना जोडून मत्स्यालयाची बांधणी करण्याचे काम एकाचवेळी आणि योग्य रीतीने समन्वय राखून होणार आहे, अशी माहिती प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
असे असेल मत्सालय :राणीबागेतील पेंग्विन प्रदर्शनी जवळच सुमारे सहाशे चौरस मीटर जागेवर हे मत्स्यालय उभारण्यात येईल. यामध्ये घुमटाकार (dome) स्वरूपाच्या प्रवेश मार्गाने शिरतांना तेथे जणू समुद्रात उतरून मत्स्य जीवन आणि जल वैविध्य (aquaculture) पाहत असल्याचा अनुभव येईल. तेथून पुढे बोगद्यासारख्या (tunnel shape) गोलाकार पद्धतीने दोन भागात मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. पैकी १४ मीटर लांबीच्या एका भागात प्रवाळ मत्स्य (coral fish) वैविध्य पाहता येईल तर ३६ मीटर अंतराच्या दुसऱ्या भागात विविध मासे आणि समुद्रातील जल परिस्थितीकी (deep ocean aquaculture) पाहता येणार आहे. या दोन गोलाकार भागांना जोडताना मधे आणखी एक घुमटाकार प्रवेश मार्ग असेल. तेथेही समुद्री जीवन न्याहाळता येईल. संपूर्ण मत्स्यालयाची निर्मिती करताना त्याला नैसर्गिक रूप बहाल करण्यासाठी समुद्र जीवनाशी मिळतीजुळती बांधणी, कृत्रिम दगड, सुसंगत प्रकाश योजना आदी घटक त्यात समाविष्ट केले जाणार आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष जणू समुद्रातच शिरून मासे आणि इतर जलचर पाहत असल्याचा आनंद मिळणार आहे.