मुंबई- शहरातील नायर, सायन, केईएम आणि कूपर रुग्णालयात 500 हुन अधिक इंटर्न डॉक्टर कार्यरत आहेत. ते सध्या जीवाची बाजी लावत कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत,असे असताना या कोरोना योद्ध्यांकडे मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. इंटर्न डॉक्टरांना 11 हजार विद्यावेतन देण्याचा निर्णय अजूनही कागदावरच आहे. तर दुसरीकडे आहे ते 6 हजार रुपयांचे विद्यावेतनही अनेकांना वेळेत मिळत नसल्याचे चित्र आहे. इंटर्न डॉक्टर आक्रमक झाले असून 11 हजार रुपये विद्यावेतन देण्याच्या मागणीसाठी त्यानी नुकतीच राज्य वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांची भेट घेतली आहे. हा तिढा सोडवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी इंटर्न डॉक्टरांना दिले आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर 2019 मध्ये राज्य सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांचे विद्यावेतन 6 हजारावरुन 11 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सरकारी आणि इतर पालिका रुग्णालयात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. मुंबईत नायरमध्ये 120, कुपरमध्ये 150, केईएममध्ये 180 आणि सायनमध्ये 100 असे 500 हून अधिक इंटर्न असून यांना मात्र अजूनही 6 रुपये इतकेच विद्यावेतन मिळत आहे. मुंबई पालिकेने अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. महत्वाचे म्हणजे काही इंटर्न डॉक्टरांना आहे ते 6 हजाराचे विद्यावेतनही मिळताना दिसत नाही.