मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी दिली आहे. दिवाळीआधीच सर्व राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दिवाळीपूर्वीच वेतन आणि निवृत्तीधारकांना निवृत्ती वेतन मिळणार आहे. (Maharashtra State Employee)
दिवाळी तोंडावर येऊन ठेपली आहे. त्याआधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत आहे. सणासाठी म्हणून राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे.
पाच लाख शिक्षकांना दिवाळीपूर्वी वेतन मिळणार -राज्यातील शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी व्हावे म्हणून शिक्षक संघटनांनी आपल्या मागण्यासह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन दिले होते. त्या निवेदनाला एक महिना पूर्ण झाला. दिवाळी तोंडावर आली, परंतु निर्णय होत नव्हता. मात्र आज पुन्हा शिक्षक परिषद यांच्यावतीने पुन्हा उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सदर प्रकरणावर तात्काळ मंजुरी देण्याची विनंती केली आणि शासनाने सकारात्मक होकार दिला आहे.
दिवाळीपूर्वी वेतन देण्याची शिक्षक परिषद मुंबईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडे ३० सप्टेंबर 2022 रोजी मागणी केली होती. या संदर्भात महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे नेते शिवनाथ दराडे यांच्यासोबत ईटीव्ही भारतने संवाद साधला असता त्यांनी नमूद केले की, २ ऑक्टोबर रोजी शिवनाथ दराडे, बाबा कदम, आनंद पवार यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री सकारात्मक होते. चर्चा करून निर्णय घेतो असे सांगितले. त्यानंतर उपमुख्यमंत्री / वित्त मंत्री यांचे सचिव यांची ११ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन वित्त मंत्री यांच्याकडे विषय परत पाठवला. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी वित्त विभागाचे उपसचिव गोरे यांची भेट घेतली असता उपमुख्यमंत्र्यांनी सदर फायलीवर त्वरित निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत, असे ते म्हणाले.