मुंबई -ओबीसी प्रर्वगाचेराजकीय आरक्षण रद्द झाल्याने ओबीसींवर अन्याय झाला आहे. याला केंद्रातील भाजपा सरकार कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची स्थिती म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे ते म्हणाले. सह्याद्री अतिथीगृहावरील सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
'आपली चूक दुसऱ्यावर विरोधीपक्षाची सवय' -
ओबीसी आरक्षण टिकले पाहिजे, अशी मागणी विरोधीपक्षांकडून केली जात आहे. परंतु, विरोधी पक्षनेत्यांची स्थिती चोराच्या उलट्या बोंबा अशी आहे. 2017मध्ये जेव्हा नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली, तेव्हा त्यांनी एका अध्यादेशाच्या आधारे या निवडणुका पुढे ढकलल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी मागासवर्ग आयोग बनवण्याचे तसेच इम्पिरिकल डेटा गोळा करून ओबीसींची संख्या किती आहे, ते कळवावे, असे आदेश दिले होते. मात्र, फडणवीस सरकार ते करु शकले नाही. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मागासवर्ग आयोगाचे गठन करुन ओबीसींचा इम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे काम सुरु आहे. यावरून आपली चूक दुसऱ्यांवर ढकलण्याची विरोधी पक्षांची सवय पुन्हा दिसून आली असल्याचेही ते म्हणाले.