मुंबई :उभारणीच्या आधीपासून वादात सापडलेले इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारक पुन्हा एकदा वादात सापडले आहे. यावेळी निमित्त ठरले आहे, डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याचा पायाभरणी समारंभाचे. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पाचा आराखडा बदलल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज आयोजित केला होता. यावरुनच महाविकासआघाडी अंतर्गत आणि आणि बाहेरुन नाराजी नाट्य उफाळून आले आहे.
हा कार्यक्रम मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाने आयोजित केल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली होती. दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री भूमिपूजनासाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रात्री उशीरा पुन्हा मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या वतीने हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सुरुवातीला पाठवलेली सगळी निमंत्रण पत्रे रद्द झाल्याचे कळवण्यात आले. कोविड प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने मुंबई शहरामध्ये कालच आयपीसी कलम 144अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळेच या कार्यक्रमावर बंधन आल्याचे सांगितले जात आहेत. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनीही निमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे भूमिपूजन कार्यक्रमाआधी रिपब्लिकन सेना आंदोलन करण्याच्या तयारीत आहे.