मुंबई - शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जीकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये सहाव्यांदा जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. अर्जात इंद्राणी मुखर्जीने तीच्यावर लावण्यात आलेले गुन्हे हे विसंगत असून साक्षीदारांवर दबाव टाकून साक्ष घेण्यात आली आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही, असा दावा केला आहे. या प्रकरणात तपास करत असलेल्या सीबीआयकडून जामिन अर्जाला विरोध करण्यात आला आहे.
इंद्राणी मुखर्जीला जामीन दिला तर या प्रकरणाचा पाया कमजोर होईल, असे म्हणत या संदर्भात अधिक उत्तर देण्यासाठी सीबीआयने वेळ मागून घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला यासंदर्भात उत्तर दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत इंद्राणी मुखर्जी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तहकूब केली आहे.
सीबीआय न्यायालयाने फेटाळली होती याचिका -
शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने सीबीआय कोर्टामध्ये दाखल केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. हा अर्ज इंद्राणी मुखर्जीने कारागृहात इतर कैद्यांप्रमाणे साडी न नेसण्यासाठी सूट मिळावी म्हणून दाखल केला होती. यात इंद्राणी मुखर्जीने युक्तिवाद केला होता की, कारागृहातील ज्या महिला कैद्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांचा पोशाख हिरव्या साडीचा आहे. मात्र माझ्यावर अद्यापही खटला चालू असून कारागृहातील हिरव्या साडीचा पोशाख न घालण्यासाठी सूट मिळावी. म्हणून तिने सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश जे.सी जगदाळे यांच्यासमोर अर्ज दाखल केला होती.