मुंबई -महाराष्ट्रातील प्रदेश युवक काँग्रेस घराणेशाहीच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत नाही. युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची वर्णी लागली आहे. भारतीय युवक काँग्रेस तरुणांच्या हाती असली पाहिजे, त्यासाठी मोठ्या नेत्यांच्या मुलांना संधी मिळण्याऐवजी धडपडणार्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र राहुल गांधी यांच्या या प्रयत्नांना महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. महाराष्ट्रातील युवक काँग्रेस ही बड्या नेत्यांच्या छत्र छायेतून बाहेर पडत नाही. बड्या नेत्यांच्या मुलांना राजकारणात संधी देणारे व्यासपीठ म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.
बड्या नेत्यांचा वारसा चालू
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र कुणाल राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर मावळते अध्यक्ष सत्यजित तांबे होते. सत्यजित तांबे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. तर डॉक्टर सुधीर तांबे यांचे सुपुत्र आहेत. तांबे यांच्या आधी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा विश्वजीत कदम यांनी सांभाळली आहे. विश्वजीत कदम हे शिक्षण आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज काँग्रेसचे नेते आणि राज्याचे तत्कालीन मंत्री पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. विश्वजीत कदम यांच्या पूर्वी राजीव सातव यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा होती राजू सातव हे माजी मंत्री रजनी सातव यांचे सुपुत्र होते.