मुंबई -राज्यात सातत्याने वाढत असलेल्या इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळ सुद्धा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने काटकसरीचा मार्ग स्वीकारला असून इंधन बचतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 31 विभाग व 250 आगारांपैकी कमी इंधनामध्ये जास्तीत जास्त अंतर कापून महामंडळाच्या तिजोरीवरील आर्थिक भार कमी करणाऱ्या राज्यातील 5 विभाग व 5 आगाराने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन गौरविण्यात आले.
या आगराचा झाला गौरव-
एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. एसटी वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. वाढत्या दरवाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर आर्थिक ताण पडत आहे. सन 2019-20 या आर्थिक वर्षात महामंडळातील 31 विभागांपैकी भंडारा , वर्धा , चंद्रपूर , गडचिरोली व जालना या 5 विभागांनी तसेच २५० आगारांपैकी भंडारा विभागातील साकोली , तिरोडा , गोंदिया व पवनी तसेच नागपूर विभागातील वर्धमान नगर अशा एकूण 5 आगारांनी कमीत कमी इंधनामध्ये सर्वाधिक अंतर कापण्याची उल्लेखनीय कामगिरी करून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यास हातभार लावलेला आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंडियन ऑइल कंपनीकडून चषक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.