महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऑक्सिजन दर निश्चितीचा रुग्णांऐवजी उत्पादकांचा फायदा.. डॉक्टरांसह खासगी रुग्णालयांची नाराजी

आम्ही ऑक्सिजनचे दर कमी करण्याची, नियंत्रित करण्याची मागणी केली होती. पण सरकारने उलट करत दर वाढवले आहेत, असे म्हणत डॉ. भोंडवे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. यामुळे आता केवळ उत्पादकांनाच फायदा होणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता या दरावरून पुन्हा आयएमए विरुद्ध सरकार असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

indian medical association angry on oxygen cylinder rate fix by government
ऑक्सिजन दर निश्चितीवर डॉक्टरांसह खागसी रुग्णालयांची नाराजी

By

Published : Sep 27, 2020, 7:07 PM IST

मुंबई -कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मागणी ही वाढली आहे. ही बाब लक्षात घेत आता राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरण (एनपीपीए)ने वैद्यकीय ऑक्सिजनचे दर निश्चित केले आहेत. पण आता या दारावर खासगी रुग्णालयासह इंडियन मेडिकल असोसिएशनने नाराजी व्यक्त केली आहे. खासगी रुग्णालयांना-रुग्णांना दिलासा देण्यासाठी, काळाबाजार रोखण्यासाठी दर नियंत्रित करणे, दर कमी करणे गरजेचे होते. पण असे न करता उत्पादकांना फायदा होईल यादृष्टीने दर वाढवण्यात आल्याचे म्हणत आयएमए महाराष्ट्रने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोना हा श्वसनाचा विकार असल्याने गंभीर रुग्णांना ऑक्सिजनची गरज पडत आहे. राज्यात फक्त कोरोनाच्या रुग्णांना दिवसाला 500 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. तर देशातील हा आकडा 2800 मेट्रिक टन इतका आहे. ऑक्सिजनच्या या वाढत्या मागणीमुळे ऑक्सिजनचा तुटवडा आणि काळाबाजार ही सुरू झाला आहे. खासगी रुग्णालयांना चढ्या दराने ऑक्सिजनची विक्री केली जात आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार केला जात आहे, अशी तक्रार आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केली होती. दरम्यान, उत्पादक चढ्या दराने ऑक्सिजन विकत असताना सरकारने खासगी रुग्णालयांसाठी जे दर निश्चित केले आहेत, ते खूपच कमी असल्याने ऑक्सिजनच्या खर्चाचा मोठा भार रुग्णालयावर पडत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचे दर नियंत्रित करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शनिवारी एनपीपीएने दर निश्चित केले आहेत. त्यानुसार आता लिक्विड ऑक्सिजनसाठी 15.22 रु प्रति घनमीटर तर सिलेंडर ऑक्सिजनचे दर 17. 49 रु. वरून 25.71 रुपये प्रति घनमीटर असे केले आहेत. पुढचे सहा महिने हे दर लागू राहणार आहेत. या दरामुळे ऑक्सिजनचा काळाबाजार रोखला जाईल की नाही हे सांगता येत नाही यामुळे रुग्णांना आणि खागसी रुग्णालयांना मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचा सूर आता आयएमएकडून निघत आहे. डॉक्टरांच्या सर्व मागण्या फेटाळायच्या हेच धोरण सध्या सरकारने अवलंबले आहे. हेच ऑक्सिजन बाबतही दिसत आहे. कारण मुळात आम्ही ऑक्सिजनचे दर कमी करण्याची, नियंत्रित करण्याची मागणी केली होती. पण सरकारने उलट करत दर वाढवले आहेत, असे म्हणत डॉ. भोंडवे यांनी यावर नाराजी व्यक्त केली. यामुळे आता केवळ उत्पादकांनाच फायदा होणार असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे आता या दरावरून पुन्हा आयएमए विरुद्ध सरकार असे चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details