मुंबई -ग्रीक गॉड म्हणून ज्याला संबोधिले जाते. त्या ह्रितिक रोशन चा ‘विक्रम वेधा’ नावाचा चित्रपट येऊ घातलाय. साधारण तीन वर्षांनी ह्रितिक Indian actor Hrithik Roshan आणि प्रेक्षकांची भेट होणार आहे. याआधी तो आणि टायगर श्रॉफ अभिनित ‘वॉर’ बॉक्स ऑफिसवर तुफान चालला होता. मधल्या काळात कोरोना संक्रमणामुळे लॉकडाऊन लागला होता त्यामुळे अनेक कलाकारांचे चित्रपट बऱ्याच कालावधीनंतर येताहेत, त्यातीलच एक म्हणजे सैफ अली खान आणि ह्रितिक रोशन च्या प्रमुख भूमिका असलेला ‘विक्रम वेधा’ जो तामिळ भाषेतील त्याच नावाचा रिमेक आहे, जो हिट ठरला होता. आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी ह्रितिक रोशनची भेट घेऊन गप्पा मारल्या त्यातील काही अंश. Indian Actor Hrithik Roshan Exclusive Interview with ETV Bharat
प्रश्न: तीनेक वर्षांनी तुझा चित्रपट येतोय, जो रिमेक आहे. काय भावना आहेत ?
उत्तर: लॉकडाऊन मुळे इतका गॅप पडलाय. हा विक्रम वेधा जरी रिमेक असला तरी आमच्यासाठी हा नवीन चित्रपट आहे. स्टोरी तीच आहे परंतु प्रत्येक कलाकार आपल्या ढंगाने आपले पात्र पेश करतोय. आम्ही एक नवीन सिनेमा बनविलाय ज्याबद्दल सर्वच समाधानी आहेत. माझ्यासाठी माझ्या अभिनयावर दिग्दर्शकाच्या पसंतीची मोहर लागणे गरजेचे असते. दिग्दर्शकद्वयी पुष्कर आणि गायत्री कडून मला खूप प्रोत्साहन मिळाले आणि त्यांनी मी सादर केलेला वेधा माझ्या पद्धतीने साकारू दिला. याचाच अर्थ ते दोघेही आधीच्या सिनेमाची नुसती नक्कल करीत नव्हते हे दिसून येते. मी सादर केलेल्या भूमिकेत ॲक्शन सोबत इमोशन्स सुद्धा आहेत कारण माझे पात्र जरी रफ-टफ असले तरी खूप हळवे देखील आहे. ते अत्यंत तरलतेने लिहिलं गेलं आहे त्यामुळे ते साकारताना मला थोडा त्रास झाला असला, तरी मी ते खूप एन्जॉय केलं. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन होणार हे नक्की. या चित्रपटाची संहिता जबरदस्त आहे. ती ऐकताच मी तिच्या प्रेमात पडलो. मी ओरोजिनल चित्रपट पाहिलाय. परंतु आमचा हा रिमेक नसून पूर्णतः फ्रेश चित्रपट आहे. मला इथे नमूद करायला आवडेल की सैफ ने जबरदस्त काम केलंय ज्याचा मला फायदा झाला माझी भूमिका साकारताना.
प्रश्न: सध्या बरेच चित्रपट चालत नाहीयेत. तुझ्या मते काय कारणं असावीत ?
उत्तर:बरेच चित्रपट जे प्रदर्शित झाले ते कोरोना-पूर्व काळातले आहेत. लॉकडाऊन मध्ये लोकांना मनोरंजनासाठी इतर माध्यमांकडे वळावे लागले. प्रेक्षकांना सिनेमात जागतिक स्तरावर काय सुरु आहे याची कल्पना आली. तसेच हल्लीचा प्रेक्षक खूप सुजाण झालाय. त्याला ‘फॉर्म्युला’ चित्रपटांमध्ये रस नाहीये. खरंतर आपण सर्वांनी ‘हिरॉइसम’ ला खतपाणी घातलेय. सिनेमाचा नायक विशिष्ट साच्यातील हवा, तो दिसायला देखणा हवा, पिळदार शरीरयष्टीचा हवा, स्टायलिश वागणारा हवा असे एक ना अनेक भ्रम पाळले गेले. परंतु हा भ्रमाचा भोपळा फुटलाय. प्रेक्षक चोखंदळ झालाय. आता कथानकं हिरो आहेत. आणि मेकर्स ना याची दखल घ्यावीच लागेल. अन्यथा त्यांना प्रेक्षकांकडून ‘फ्लॉप’ ची ‘थप्पड’ मिळेल. हल्ली रियालिटी कडे झुकणाऱ्या कथा प्रेक्षकांना भावतात. म्हणजे त्यात चिकना हिरो वगैरे नसावाच असे काही नाही. त्याची आणि ‘रियल’ अभिनयाची सांगड घातली की प्रेक्षकांना ते आवडतेय. माझासुद्धा तोच प्रयत्न आहे. ‘विक्रम वेधा’ नक्कीच आजच्या प्रेक्षकांना आवडेल असा आहे. लॉकडाऊन नंतर संपूर्ण जग बदललंय. मी सुद्धा बदललोय, लॉकडाऊन नंतर. माझ्या विचारांत बदल झालाय. मी ‘इव्हॉल्व्ह’ झालोय, आणि मला ते आवडतेय.
प्रश्न: गेल्या २२ वर्षातील तुझा हा २५ वा चित्रपट. इतकी वर्षे फिटनेस, शारीरिक आणि मानसिक, कसा सांभाळला आहेस ?
उत्तर: ‘विक्रम वेधा’ माझ्या २२ वर्षांच्या कारकिर्दीतील २५ वा चित्रपट आहे. अर्थातच प्रत्येक चित्रपटासाठी मी मेहनत घेतली आहे तशीच याही चित्रपटासाठी घेतली. परंतु मगाशी मी म्हणालो की मी ‘इव्हॉल्व्ह’ झालोय. ‘काबील’ नंतर मला अनेक गोष्टींचा साक्षात्कार झाला. माझ्या करियर चे मी दोन भाग केलेत. एक ‘काबील’ आधीचा आणि दुसरा नंतरचा. आधीच्या भागात मी ठीकठाक कामं केलीयेत असं मला वाटतं. परंतु काबील नंतर माझ्या अभिनयात आमूलाग्र बदल झालाय असं मला जाणवतंय. फिटनेस चं सांगायचं तर शारीरिक फिटनेस या व्यवसायाची गरज आहे. परंतु मला आता रोज उद्या आजच्या पेक्षा जास्त फिट राहायचंय. नवीन चॅलेंज घ्यावं लागेल असे रोल्स साकारायचे आहेत. परंतु मानसिक फिटनेस राखणं अत्यंत जरूरीचं आहे असं मला वाटतं. मी मानसिक संतुलनासाठी ज्ञानसाधना करतो. खरं म्हणजे माझ्या ज्ञानसाधनेचा व्हिडीओ सर्वांबरोबर शेयर करणार आहे. ‘विक्रम वेधा’ चे शूटिंग करताना प्रत्येक शॉटनंतर मी माझ्या व्हॅनिटी व्हॅन मध्ये परतून ‘मेडिटेशन’ करीत असे. खऱ्या आयुष्यात मी खूप चंचल आहे परंतु ‘मेडिटेशन’ मुळे स्थिर वेधा मी सशक्तरित्या साकारू शकलो. मला ज्ञानसाधनेचा फायदा रोजच्या आयुष्यात होऊ लागला आहे आणि मी बराच निरव झालोय.
प्रश्न: सध्या ओटीटी चा जमाना आलाय आणि फक्त दाक्षिणात्य सिनेमे चालताहेत असं म्हटलं जातंय. तुला काय वाटतं ?
उत्तर:मी प्रादेशिक सिनेमा, हिंदी सिनेमा असा भेदभाव करीत नाही. माझ्यासाठी सर्व चित्रपट भारतीय चित्रपट आहेत. ओटीटी बद्दल बोलायचं झालं तर हे खूप चांगलं घडलंय. प्रेक्षकांना जास्तीत जास्त वैविध्यपूर्ण मनोरंजन मिळतंय. याच्यामुळे या नवीन प्रेक्षकांना, नवीन नजरेच्या ऑडियन्स ला, नवीन विचारसरणीच्या लोकांना सशक्त चित्रपट देणे हे फिल्म इंडस्ट्रीचे कर्तव्य आहे. यामुळे फिल्म मेकर्सचा नजरिया बदलेल आणि उत्तमोत्तम चित्रपट प्रेक्षकांसाठी बनविले जातील, अन्यथा.....! मी स्वतः ज्या कथानकांना नाही म्हणूच शकत नाही असेच चित्रपट स्वीकारतोय, करू कि नको असा विचार आला तर करतंच नाही. त्यामुळे या इंडस्ट्रीमध्ये प्रत्येकाने बदलाला सामोरं जाण्याची गरज आहे.