मुंबई- निकालानंतर भाजपच्या गोटात सामील झालेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर झोडगेवार यांनी बहुमत चाचणीत आघाडीला मतदान केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदारसंघातील विकास कामे सत्तेत असतानाच चांगली होतात, यासाठी महाविकासआघाडीला समर्थन दिल्याचे झोडगेवार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अपक्ष आमदार किशोर झोडगेवार यांनी भाजपला समर्थन देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, संख्याबळाअभावी फडणवीस यांनी राजीनामा देताच किशोर झोडगेवार यांनीही आपला निर्णय बदलला. झोडगेवार यांच्या सोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदारसंघातील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावही तळ्यात-मळ्यात होते. मात्र, पाटील यांनीही बहुमत चाचणीत महाविकासआघाडीच्या पारड्यात मत टाकले.
झोडगेवार म्हणाले, महायुतीचे सरकार स्थापन होऊन त्यांचे सरकार येईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे त्यांना पाठिंबा दिला होता. अपक्ष आमदारांच्या काही मर्यादा आणि गरजा असतात. चंद्रपूरच्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन महाविकासआघाडीच्या सत्तेत सहभागी होण्याचे ठरविले आहे. ज्यांचे सरकार त्यांना मदत करायची, अशी भूमिका आधीच घेतली होती, असेही त्यांनी सांगितले.