मुंबई:- मुंबईतील कॊरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या जी-उत्तरमधील धारावीतील कॊरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात येत आहे. ही दिलासादायक बाब ठरत असताना दुसरीकडे मात्र माहीम आणि दादरमधील पोलीस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वाढणारा संसर्ग आता मुंबई महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण आतापर्यंत येथे 68 पोलीस आणि 38 आरोग्य कर्मचाऱ्यांना कॊरोनाची लागण झाली आहे.
दादर-माहीममध्ये पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढता संसर्ग - 38 आरोग्य कर्मचाऱ्यांना कॊरोनाची लागण
माहीम आणि दादरमधील पोलीस तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये वाढणारा संसर्ग आता मुंबई महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कारण आतापर्यंत येथे 68 पोलीस आणि 38 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
दादर आणि माहीममध्ये पोलीस वसाहती आहेत, तर नर्स आणि आरोग्य कर्मचारीही मोठ्या संख्येने या परिसरात राहतात. त्यातच पालिकेच्या कर्मचाऱ्यांचेही वास्तव्य येथे आहे. हे सर्व कॊरोनाच्या लढाईत योद्धा म्हणून काम करत असून अशावेळी त्यांना संसर्ग होत आहे. त्यानुसार दादरमधील पोलीस वसाहतीत आतापर्यंत 59 पोलीस कॊरोनाग्रस्त आढळले आहेत, तर माहीम पोलीस वसाहतीतील 9 पोलिसांना कॊरोनाची लागण झाली आहे.
पोलिसांनंतर नर्स-आरोग्य कर्मचारी कॊरोनाचे शिकार ठरत आहेत. दादरमध्ये राहणाऱ्या 27 नर्स-कर्मचाऱ्यांना कॊरोनाची लागण झाली असून ब्रीच कँडी, रहेजा आणि हिंदुजा रुग्णालयातील हे नर्स-कर्मचारी आहेत. माहीममध्ये सुश्रुषा रुग्णालयातील 11 नर्स-कर्मचारी कॊरोनाग्रस्त आहेत. त्याचवेळी माहीम मधील कासारवाडी येथे 18 पालिका कर्मचारी कॊरोनाचे रूग्ण आहेत. एकूणच हे सर्व कर्मचारी अत्यावश्यक सेवेत येत असल्याने ते राहत असलेल्या परिसरात कॊरोनाला कसे रोखायचे हा मोठा प्रश्न सध्या आमच्यासमोर असल्याचे एका वरिष्ठ पालिका अधिकाऱ्याने दिली आहे.