मुंबई -काही दिवसांपूर्वी सीएसएमटी आणि वांद्रे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब ठेवण्याचा निनावी काॅल आल्याने सर्व सुरक्षा यंत्रणेद्वारे स्थानकाची तपासणी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा कामाला लागली होती. आता काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आला असून त्यानिमित्त रेल्वे परिसर आणि रेल्वे स्थानकात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांचे, आरपीएफ विभागाचे तपासणी, पाहणी दौरे सुरू झाले आहेत. रेल्वे प्रवासी, नागरिक, रेल्वे कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर यांच्यात दक्ष व सतर्क राहण्याची जनजागृती करण्यात आली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ; सर्वच यंत्रणा सज्ज - मुंबईतील रेल्वे स्टेशनमधील सुरक्षा वाढवली
काही दिवसांपूर्वी सीएसएमटी आणि वांद्रे रेल्वे स्थानकावर बाॅम्ब ठेवण्याचा निनावी काॅल आल्याने सर्व सुरक्षा यंत्रणेद्वारे स्थानकाची तपासणी केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तपास यंत्रणा कामाला लागली होती. आता काही दिवसांवर प्रजासत्ताक दिन आला असून त्यानिमित्त रेल्वे परिसर आणि रेल्वे स्थानकात सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांचे, आरपीएफ विभागाचे तपासणी, पाहणी दौरे सुरू झाले आहेत. रेल्वे प्रवासी, नागरिक, रेल्वे कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर यांच्यात दक्ष व सतर्क राहण्याची जनजागृती करण्यात आली आहे.
सतर्क राहण्याबाबत जनजागृती -
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील सीएसएमटी, एलटीटी, दादर, कुर्ला, चर्चगेट, घाटकोपर, ठाणे आणि पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, मुंबई सेंट्रल, दादर, वांद्रे, अंधेरी, बोरीवली येथील पोलीस रेल्वे ठाण्यात रूट मार्च करण्यास सुरूवात केली आहे. रेल्वे पोलिसांनी बूट पाॅलिश, हमाल, सफाई कर्मचारी यांना सुरक्षेबाबतचे धडे दिले आहेत. मुख्यत: टर्मिनसवर रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढविली आहेत. मुंबई सेंट्रल टर्मिनस व लोकल रेल्वे स्टेशन, चर्चगेट रेल्वे स्टेशन व वांद्रे रेल्वे स्टेशन सर्व स्टेशन लगतचा परिसरात पाहणी दौरे करण्यात येत आहे. रेल्वे स्थानक, रेल्वे परिसर, अडगळीच्या ठिकाणी, जास्त रहदारीच्या ठिकाणी, स्थानक परिसरातील सर्व फलाट, बुकिंग ऑफीस, रेल्वे स्टेशन, रेल्वे परिसरात, स्थानकालगत बाहेरील परिसरात रूट मार्च करून रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी, नागरिकांमध्ये, रिक्षा ड्रायव्हर या सर्वांना दक्ष व सतर्क राहण्याबाबत जनजागृती करून महत्वाच्या सुचना देण्यात आल्या.
सर्वच यंत्रणा सज्ज -
पोलिसांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे पोलिसांकडून करण्यात आले आहे. लोहमार्ग पश्चिम रेल्वे परिमंडळाचे पोलीस उपआयुक्त, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, वांद्रे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रेल्वे सुरक्षा बलाचे दोन प्रभारी अधिकारी, एक सहाय्यक पोलीस निरीक्षक, पाच पोलीस उपनिरीक्षक, 59 पोलीस अंमलदार तसेच, रेल्वे सुरक्षा बलाचे दोन अधिकारी आणि 10 जवानाद्वारे पाहणी दौरे करण्यात येत आहेत. येत्या दोन दिवसात हे तपासणी दौरे सुरू राहणार आहेत, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदार पवार यांनी दिली आहे.
गर्दीच्या स्थानकावर फौजफाटा वाढविला जाणार-
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर फलाटे, जिने, पादचारी पूल, रेल्वे परिसरात गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. सुरक्षा जवानांच्या साहाय्याने गर्दी हटविण्याचे काम केले जाणार आहे. कोणत्या ठिकाणी गर्दी झाल्यास तिला हटविण्यासाठी सुरक्षा जवानाकडून उद्घोषणा केली जाईल. प्रजासत्ताक दिनापासूनच मुंबईतील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकावर फौजफाटा वाढविला जाणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवानांना जादा वेळ कर्तव्य बजाविण्याच्या सुचना केल्या आहेत. यासह हमाल, बूट पाॅलिशवाल्यांना सुरक्षेचे धडे देण्यात आले आहेत अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आले आहे.