मुंबई -दरवर्षी पावसाळ्यात मुंबईची(Mumbai Rain) तुंबई होते. थोड्या पावसातही हिंदमाता, सायन, किंग सर्कल आदी भागात पाणी साचते. यावर उपाय म्हणून दादर हिंदमाता परिसर पूरमुक्त(Dadar Hindmata Area) करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. हिंदमाता परिसराला पूरस्थितीपासून कायमस्वरूपी दिलासा देण्यासाठी मायक्रोटनेलिंग, पर्जन्य जलवाहिन्या टाकणे व नाल्याच्या भिंतीची पुनर्बांधणी आदी कामे केली जात आहेत. त्यासाठी पालिका ८३ कोटी रुपये खर्च करणार होती. मात्र या कामांत काही बदल झाल्याने आता त्यापोटी पालिकेला अतिरिक्त ६० कोटींचा खर्च येणार आहे. मात्र ही वाढीव कामे सदर कंत्राटदाराला वेगळे नवीन टेंडर न काढता देण्यात आले आहेत.
हिंदमाता पूरमुक्त -
मुंबईत कमी वेळात जास्त पाऊस पडतो. काही तास सतत पाऊस पडल्यास पाणी साचून मुंबई ठप्प होते. मुंबई महापालिकेने २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी व सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ८ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम हाती घेतले होते. त्यातील ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले असून अद्यापही माहुल व मोगरा पंपिंग स्टेशनची कामे प्रलंबित आहेत. पालिकेने हिंदमाता परिसरात पावसाळ्यात पाणी साचून होणारी पूरस्थिती दूर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून ब्रिटनिया पंपिंग स्टेशन उभारले. मात्र, तरीही हिंदमाता येथील पूरस्थितीमध्ये फार मोठा फरक पडलेला नाही. त्यामुळे आता हिंदमाता येथे साचणाऱ्या पाण्याचे भूमिगत टाक्या बांधून त्यात साठा करून त्याचा हळूहळू निचरा करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी मायक्रोटनेलिंग पद्धतीने एफ/ दक्षिण भागातील डॉ. बी. ए. रोड मार्गावरील लालबाग पोलीस चौकीपासून ते श्रावण यशवंते चौकापर्यंत १८०० मिमी व्यासाच्या आकाराची अतिरिक्त पर्जन्यजलवाहिन्या टाकण्यात आली आहे. मुळात हे कंत्राटकाम १४.५० टक्के जादा दराने मे. मिशिगन इंजिनियर्स या कंत्राटदाराला ३९.८३ कोटीत देण्यात आले. मात्र काही कारणास्तव कामातील बदल व वाढीव कामांमुळे खर्चात तब्बल ३२.७२ कोटी रुपयांची वाढ झाल्याने कंत्राटकामाची किंमत ३९.८३ कोटी रुपयांवरून थेट ७२.५६ कोटींवर गेले आहे.
कंत्राटाच्या किमतीत वाढ -