महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत महिनाभरात ४ हजार सक्रिय रुग्णात वाढ, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 320 दिवसांनी घसरला - mumbai corona latest news

मुंबईमधील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत काल घट झाली असली तरी एका महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 320 दिवसांनी कमी झाला आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे 4 हजारांनी वाढ झाली आहे.

corona
कोरोना

By

Published : Mar 2, 2021, 7:32 PM IST

मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला होता. मुंबईत कोरोनाचे 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. गेले चार ते पाच दिवस मुंबईत 1 हजारावर रुग्ण आढळून येत होते. सोमवारी त्यात किंचितशी घट झाली असून, 855 नवे रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईमधील नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णसंख्येत काल घट झाली असली तरी एका महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 320 दिवसांनी कमी झाला आहे. तर सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे 4 हजारांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा -मुंबई उच्च न्यायालयाचा पालकांसह राज्य सरकारला मोठा दिलासा

कोरोना रुग्णांची आकडेवारी -

मुंबईत सोमवारी कोरोनाचे 855 नवे रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 26 हजार 770 वर पोहचला आहे. 4 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आतापर्यंतचा एकूण आकडा 11 हजार 474 वर पोहचला आहे. 876 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 4 हजार 736 वर पोहचली आहे. मुंबईत 9 हजार 690 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 244 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 10 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर, 137 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 32 लाख 91 हजार 721 चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

रुग्ण दुपटीचा, सक्रिय रुग्ण संख्या वाढली -

मुंबईत 1 फेब्रुवारीला रुग्ण दुपटीचा कालावधी 564 दिवस इतका होता. हा कालावधी गेल्या एका महिन्यात झपाट्याने कमी झाला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी 244 दिवस इतका झाला आहे. एका महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 320 दिवसांनी कमी झाला आहे याचाच अर्थ मुंबईत रुग्णसंख्या वाढत आहे. तर 1 फेब्रुवारीला 5656 इतके सक्रिय रुग्ण होते. त्यात एका महिन्यात वाढ झाली असून सध्या मुंबईत 9 हजार 690 सक्रिय रुग्ण आहेत. एका महिन्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत सुमारे 4 हजारांनी वाढ झाली आहे.

हेही वाचा -आपल्या ट्रान्समिशन लाईन्स सायबर हल्ला होण्याइतक्या आधुनिक नाहीत - बावनकुळे

हे विभाग हॉटस्पॉट -

मुंबईत बोरिवली, अंधेरी पूर्व, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, टिळक नगर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात कोरोनाचे नियम पाळावेत म्हणून सोसायट्यांना पालिकेने नोटीस बजावल्या आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या वाढली -

मुंबईत 6 जानेवारीला 795, 7 जानेवारीला 665, 8 जानेवारीला 654, 10 जानेवारीला 656 कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रोज 300 ते 500 रुग्ण आढळून येत होते. 14 फेब्रुवारीला 645, 15 फेब्रुवारीला 493, 16 फेब्रुवारीला 461, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760, 23 फेब्रुवारीला 643, 24 फेब्रुवारीला 1 हजार 167, 25 फेब्रुवारीला 1 हजार 145, 26 फेब्रुवारीला 1 हजार 34, 27 फेब्रुवारीला 987, 28 फेब्रुवारीला 1 हजार 51, तर काल 1 मार्चला 855 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद -

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 सर्वात कमी रुग्ण आढळून आले.

2 लाख 28 हजार 840 लाभार्थ्यांना लस -

कालपर्यंत 2 लाख 5 हजार 13 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस तर 23 हजार 827 लाभार्थ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. कालपर्यंत एकूण 2 लाख 28 हजार 840 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 1,29,965 आरोग्य कर्मचारी, 96,893 फ्रंटलाईन वर्कर, 45 ते 59 वर्षामधील आजारी असलेले 260 तर 60 वर्षावरील 1,722 व्यक्ती अशा एकूण 2,28,840 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

महापालिकेचे प्रयत्न -

मुंबईमध्ये रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात वाढत असल्याने त्यावर देखरेख ठेवून आहोत. चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. एकाच इमारतीत ५ रुग्ण आढळून आल्यास इमारत सील केली जात आहे. रुग्ण किंवा रुग्णाच्या संपर्कातील लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. नियम मोडल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. मास्क वापरण्याचे आवाहन वारंवार करूनही मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. वारंवार मास्क न वापरणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details