मुंबई- मानवी वस्तीत मुंबईच्या मध्यभागी असलेल्या बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या वाढली. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या बिबट्या गणना अहवाल २०१८ मध्ये उद्यानात ४७ बिबटे आढळून आले आहेत. यात १७ नर तर २७ मादी बिबट्यांचा समावेश असून ३ बिबट्यांच्या लिंगाची ओळख पटली नाही.
गेल्या चार वर्षांपासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अधिवास करणाऱ्या बिबट्यांच्या गणनेचे काम केले जात आहे. उन्ह्याळ्याच्या दिवसात उद्यानात ठिकठिकाणी कॅमेरा ट्रॅप बसवून हा अभ्यास पार पडतो. 'वाइल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी-इंडिया'चे संशोधक निकित सुर्वे आणि वनविभागाच्या मदतीने हा अभ्यास केला जातो. कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून टिपलेल्या बिबट्यांच्या छायाचित्रांच्या आधारे त्यांच्या संख्येची नोंद होते.
गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत डिसेंबर महिन्यात सापळ्यात अडकून मृत्यू झालेल्या 'पाणी' या मादी बिबट्याच्या पिल्लाचा मागोवा घेण्यास संशोधकांना यश आले आहे. या बिबट्याचे नाव पुरी असे असून १ मार्चला त्याचे छायाचित्र राष्ट्रीय उद्यानात टिपण्यात आले आहे. त्यामुळे या पिल्लाने चित्रनगरी परिसरातून स्थलांतर करुन उद्यानाच्या मध्यभागी स्वत:ची हद्द निर्माण केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२०१५ ला ३५ तर २०१७ ला ४१ बिबटे उद्यान परिसरात आढळून आले होते. ४७ बिबट्यांपैकी २५ बिबट्यांचे छायाचित्र २०१५ आणि २०१७ च्या छायाचित्रांशी जुळले आहेत. तर उर्वरित २२ बिबट्यांचे छायाचित्र नव्याने टिपण्यात आले आहेत. यामध्ये १९ बिबटे २ ते ४ या वयोगटातील आहेत. मात्र २०१७ मधील १६ बिबटे या अभ्यासात छायाचित्रित होऊ शकलेले नाहीत.