महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांच्या दंडात वाढ

मुंबईत रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांच्या दंडात वाढ करण्यात आली आहे. भाजप नगरसेविका नेहला शाह यांनी अशा जनावरांच्या मालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून जास्त रक्कमेचा दंड आकारण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने आता दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पादचारी पथावरील गाय

By

Published : Jul 29, 2019, 11:39 PM IST

मुंबई - जनावरांना रस्त्यावर बांधून त्यांच्यासाठी विकत चारा देत आपला उदरनिर्वाह करणारे अनेक लोक मुंबईत आहेत. अशा लोकांवर कारवाई करून त्यांच्याकडून जास्त रक्कमेचा दंड आकारण्याची मागणी भाजप नगरसेविका नेहला शाह यांनी केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने या लोकांवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. रस्त्यावर बांधलेल्या गुरांना पकडल्यास सध्या अडीच हजार रूपये इतका दंड आकारला जातो. त्यात वाढ करून आता १० हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचा अभिप्राय पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.


मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधली जातात. तेथेच त्यांना चारा खाऊ घातला जातो. मात्र ही जनावरे बांधलेल्या जागी त्यांची विष्ठा पडुन परिसरात दुर्गंधी पसरते. असे आढळून आल्यास अशी जनावरे कोंडवाडा विभागामार्फत जप्त करण्यात येतात. आतापर्यंत पकडून नेलेल्या जनावरांची सोडवणूक करण्यासाठी अडीच हजार रूपये इतका दंड आकारला जात होता.


जनावरे जप्त केल्यानंतर त्यांना मालाड येथे नेण्यासाठी महापालिका वाहन, कर्मचारीवर्ग, वाहनांचे इंधन आदींवर मोठ्या प्रमाणावर खर्च येतो. हा खर्च दंडाच्या स्वरुपातून वसूल केला जातो. महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाई दरम्यान वसूल करण्यात येणारी दंडाची रक्कम पाहता पालिकेला नुकसान होत असल्याने कारवाई करताना दंडाच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी नेहला शाह यांनी पालिका सभागृहात एका ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. त्यावर पालिका प्रशासनाने अभिप्राय देत दंडाच्या रक्कमेत अडीच हजारावरून १० हजार रुपये इतकी वाढ करत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे यापुढे जनावरे पकडून नेल्यास ती सोडवण्यासाठी संबंधित मालकाला दहा हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावरून वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

असा आकारला जाणार दंड -
कोंडवाड्यामार्फत पकडण्यात येणार्‍या मोठ्या जनावरांसाठी सध्या २५०० रुपये दंड तर लहान जनावरांसाठी १५०० रुपये दंडाची रक्कम आकारली जाते. मार्च २००४ मध्ये महापालिकेने मंजूर केल्याप्रमाणे ही दंडाची रक्कम आकारली जाते. पण आता मोठ्या जनावरांसाठी १० हजार रुपये तर लहान जनावरांसाठी ६ हजार रुपये इतका दंड आकारला जाईल, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details