मुंबई -गोरेगाव येथील आरे जंगलात आगीच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. मागील आठवड्याभरात तर दररोज आग लागत असून, महिन्याभरात येथे 30 ते 33 आगीच्या घटना घडल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत. पण आरे कॉलनी प्रशासनाने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आरेत कुठेही मोठ्या आणि सतत आग लागल्याच्या घटना घडल्या नसून, यासंबंधीच्या कुठल्याही तक्रारी आमच्याकडे आल्या नसल्याची माहिती आरे कॉलनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नथ्यू राठो़ड यांनी दिली आहे. मात्र राठोड यांच्या या प्रतिक्रियेवर पर्यावरण प्रमींनी संताप व्यक्त केला असून, प्रशासन आगीच्या घटनांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे.
अनधिकृत बांधकामासाठी लावल्या जाते आग?
आरे जंगलावर सध्या बिल्डरांचा आणि भूमाफियांचा डोळा आहे. गेल्या काही वर्षांत येथे मोठ्या संख्येने अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. आरेतील झाडांची बेकायदा कत्तल करत त्या जागेवर या झोपड्या उभ्या केल्या जातात. तर या अनधिकृत झोपड्या आणखी वाढवत आरेतील जागा लाटण्याचा बिल्डर आणि भुमाफियांचा डाव आहे. दरम्यान पर्यावरण प्रेमी आणि आदिवासी मागील काही वर्षांपासून सेव्ह आरेच्या माध्यमातून अनधिकृत बांधकामे करण्याचा डाव हाणून पाडत आहेत. त्यामुळे आता आग लावून जमीन मोकळी करण्याचा बिल्डरांचा डाव आहे. त्यामुळे या महिन्याभरात दररोजच आगीच्या घटना घडत असल्याची माहिती पर्यावरण प्रेमी संजीव वल्सन यांनी दिली आहे. गेल्या आठवड्याभरापासून तर दररोज आग लागत आहे. एकही दिवस आग लागली नाही असे घडले नाही. शुक्रवारी तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आरेतील बंगल्याजवळ मोठी आग लागली होती. तीन किलोमिटरवरून आगीचे लोळ दिसत होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना ही आग दिसली नाही. या आगीची कोणही दखल घेतली नाही. त्यामुळे आग लावणाऱ्यांना प्रशासनाने अभय दिले आहे का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.