मुंबई - यंदाही पावसाळी आजाराला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या १८ दिवसात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, गॅस्ट्रोच्या रुग्णसंख्येत आठ दिवसांत दुपटीने वाढ झाली आहे. आठवडाभरात डेंग्यूचे ५९ रुग्ण आढळले असून मलेरियाचे तब्बल १९१ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सप्टेंबरमधील मलेरिया रुग्णांची संख्या ३९८ तर डेंग्यू रुग्णसंख्या १३९ वर पोहोचली आहे. तर स्वाईन फ्ल्यू व चिकनगुनीया आटोक्यात आल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
रुग्णसंख्येत वाढ -मुंबईमध्ये १ ते १८ सप्टेंबरपर्यंत १८ दिवसात मलेरियाचे ३९८ रुग्ण, लेप्टोचे २७, डेंग्यूचे १३९, गॅस्ट्रोचे २०८, हेपेटायसिसचे ४५, चिकनगुनियाचे २ तर एच १ एन १ म्हणजेच स्वाईन फ्लूच्या ६ रुग्णांची नोंद झाली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये मलेरियाचे ७८७ रुग्ण, लेप्टोचे ६३, डेंग्यूचे १६९, गॅस्ट्रोचे ४६७, हेपेटायसिसचे ५१, चिकनगुनियाचे ३ तर एच १ एन १ च्या १८९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर २०२१ मध्ये मलेरियाचे ६०७ रुग्ण, लेप्टोचे ४६, डेंग्यूचे २५६, गॅस्ट्रोचे २४५, हेपेटायसिसचे २८, चिकनगुनियाचे ७ तर एच १ एन १ च्या ९ रुग्णांची नोंद झाली होती. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात हेपेटायसिस मुळे १ रुग्णाचा मृत्यू झाला होता.
या आजारामुळे झाले मृत्यू -२०१९ मध्ये लेप्टोमुळे ११, डेंग्यू मुळे ३, हेपेटायसिसमुळे १, तर स्वाईन फ्लुमुळे ५ अशा एकूण २० जणांचा मृत्यू झाला होता. २०२० मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ८, डेंग्यूमुळे ३ अशा एकूण १२ जणांचा मृत्यू झाला होता. २०२१ मध्ये मलेरियमुळे १, लेप्टोमुळे ६, डेंग्यूमुळे ५, हेपेटायसीसमुळे १ असा एकूण १३ जणांचा मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये आतापर्यंत मलेरियाने १, लेप्टोने १, डेंग्यूने २ तर एच १ एन १ ने २ अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे.