मुंबई -देशात फेसबुकच्या माध्यमातून सायबर गुन्हे घडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याचे समोर आले आहे. फेसबुक सारख्या समाज माध्यमांवर लॉटरी आणि ऑनलाईन व्हिडीओ गेमच्या माध्यमातून फेसबुक युजर्सना वेगळ्याच संकेत स्थळांवर लॉग इन करण्यास सांगून संबंधित व्यक्तीचे बँक अकाउंट डिटेल्स, पॅनकार्ड, आधारकार्ड डिटेल्स घेऊन नागरिकांना फसवले जात आहे.
भारत हा जगात सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांपैकी एक आहे. भारतात तरुण वर्ग हा सर्वाधिक फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर आपला वेळ खर्ची करताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे इंटरनेटचा वापर वाढत आहे. त्याच प्रमाणात या इंटरनेटच्या माध्यमातून सायबर गुन्हे करणारे हॅकर जगातल्या कुठल्याही ठिकाणाहून अगदी सहज आपले सावज टिपून आर्थिक गुन्हे करत आहेत.
फेसबुक सारख्या सोशल माध्यमांवर स्वतःचे फोटो, वैयक्तिक माहिती, ईमेल आणि मोबाईल क्रमांक पोस्ट करणे धोक्याचे आहे. बऱ्याच प्रकरणात एखाद्या व्यक्तीची बदनामी करण्यासाठी फेसबुक अकाउंटवरील खासगी फोटो मॉर्फ करुन समाज माध्यमांवर व्हायरल केले जात आहेत.