मुंबई - गेल्या दोन निवडणुकांआधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेते भाजपमध्ये सामील झाले. पण, आता महाविकास आघाडी स्थिरावत असल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर पुन्हा ते नेते काँग्रेस आणि राष्ट्रवादीत परत येतील, असे भाकीत राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिम्मित मलिक यांच्याशी 'ई टीव्ही भारत'ने संवाद साधला.
गेल्या वर्षभरात भाजपकडून वारंवार सरकार पडणार सरकार पडणार असे दावे केले. पण, ते दावे फोल ठरले आहेत. सरकार काही पडणार नाही, पण आलेल्या नेत्यांना थोपवून धरण्यासाठी भाजपकडून सरकार पडणार असल्याचे दावे करण्यात येत असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी वरचढ नाही, पवार साहेब मुख्य मार्गदर्शक
प्रसारमाध्यमात महाविकास आघाडीत इतर घटक पक्षांच्या तुलनेत राष्ट्रवादीच वरचढ असल्याचे म्हटले जात आहे. हे खरे नाही, महाविकास आघाडीत सर्वच घटक पक्षांना समान अधिकार आहेत. कोणत्याही विभागात ढवळाढवळ केली जात नाही. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या तुलनेत शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा अनुभव फार मोठा आहे, त्यामुळे शरद पवार केवळ मार्गदर्शक आहेत. त्यांचा सल्ला हा महत्वाचा आहे.