महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई, पुणे, सांगलीसह 26 ठिकाणी आयकर विभागाची शोधमोहीम; शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय रडारवर? - income tax raid shivsena

26 ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Raid) 8 मार्च रोजी छापेमारी केली होती. यामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे.

income tax file photo
आयकर विभाग फाईल फोटो

By

Published : Mar 17, 2022, 9:13 PM IST

मुंबई - मुंबई, पुणे, सांगली आणि रत्नागिरीसह 26 ठिकाणी आयकर विभागाने (Income Tax Raid) 8 मार्च रोजी छापेमारी केली होती. यामध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर ईडी आणि आयकर विभागाकडून कारवाईचे सत्र सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या जवळचे असलेले युवासेनेचे नेते तथा शिर्डी संस्थानचे अध्यक्ष राहुल कनाल यांच्यासह परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेले केबल ऑपरेटर सदानंद कदम तसेच वादग्रस्त आरटीओ बजरंग खरमाटे आणि अनिल परब यांचे सीए त्यांच्यासह अनेक ठिकाणी छापेमारी केली होती.

लाखोंची मालमत्ता जप्त -

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये 66 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. बनावट व्यवहार आणि बनावट कागदपत्रांच्या साह्याने जवळपास 27 कोटी रुपयांचा अपहार केला गेला आहे. बारामती येथे 2 कोटी रुपये रोख देऊन जमिनीचा व्यवहार करण्यात आला. ज्यात कर बुडवण्यात आला असल्याचे समोर आले आहे. छाप्या दरम्यान इलेक्ट्रॉनिक पुरावे, डिजिटल डेटा जप्त करण्यात आला असून ते फॉरेंसिक चाचणीकरता पाठवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथे एका मोठ्या राजकीय नेत्याने 2017 साली जमीन खरेदी केली होती. 1 कोटीच्या बदल्यात ही जमीन देण्यात आली होती. या 1 कोटी 10 रुपयांची व्यवहाराची नोंद 2019 मध्ये करण्यात आली. 2017 ते 2020 या दरम्यान या जमिनीवर मोठे आलीशान रिसॉर्ट बनवले गेले. यानंतर ही जमीन अधिकृतरित्या त्या राजकीय नेत्याच्या नावे झाली. पण रिसॉर्ट पुर्ण झाल्यावर ही संपत्ती मुंबईतील एका केबल व्यावसायिकाला विकण्यात आली. पण फक्त स्टॅम्प ड्युटी भरली गेली. या रिसॉर्टवर 6 कोटी खर्च करण्यात आले होते.

एका सरकारी अधिकाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यातही मोठी माहिती समोर आली. या सरकारी अधिकाऱ्याने पुण्यात एक बंगला, एक फार्म हाऊस, तासगाव येथे मोठे फार्म हाऊस, सांगलीमध्ये 2 बंगले, तनिष्क व कॅरेट नावाचे हिऱ्यांच्या दागिन्यांचे शोरुम, व्यावसायिक गाळे, पुण्यात 5 फ्लॅट, नवी मुंबईत एक फ्लॅट, नवी मुंबईत जमीन, सांगली बारामती पुणे येथे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची संपत्ती अशी माया गोळा केली. एवढंच नाहीतर बांधकाम व्यावसाय आणि पाईप निर्मितीचा व्यवसाय सुद्धा सुरू केला. या व्यवसायात राज्य सरकारमार्फत काही सवलतही दिली गेली आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी -

दरम्यान, राज्यातील सत्ताधारी पक्षातील नेते केंद्र सरकारवरती सतत आरोप करत आहेत की, तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांवरती आरोप केले आहेत. नवाब मलिक, भावना गवळी, एकनाथ खडसे यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. नवाब मलिक यांची सध्या जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरु आहे. अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरतीही धाड पडली होती. राज्यातील नेत्यांना मुद्दामून अडकवले जात असल्याची टीका सत्ताधारी करत आहेत. तर कर नाही त्याला डर कशाला असे विरोधक म्हणत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details