मुंबई -राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून राज्यात केंद्रीय यंत्रणा सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार विरोधात केंद्र सरकार एनसीबी तसेच ईडी या यंत्रणेचा प्रमुख्याने मोठ्या प्रमाणात उपयोग करत असल्याचे अनेक आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे, मात्र आता आयकर विभाग देखील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सक्रिय झाले असल्याचे चित्र दिसत आहे.
हेही वाचा -Sanjay Raut On Fadnavis : 'मग, पोलिसांनी यांना चौकशीसाठी बोलावल्यावर हा तमाशा का ?' संजय राऊत यांचा सवाल
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आयकर विभागाकडून मागील महिन्यापासून मोठ्या प्रमाणात धाडसत्र सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळचे समजले जाणारे शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाच्या तीन दिवस, दिवस रात्र धाडी सुरू होत्या. यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाने अनेक महत्त्वाचे कागदपत्र देखील जप्त केले. तसेच, अनेक खाते देखील सिल केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यशवंत जाधव यांच्या घरावरील धाडीनंतर आयकर विभागाने पुन्हा मातोश्रीच्या जवळ असलेले राहुल कली यांच्या निवासस्थानी धाड टाकून चौकशी सुरू केली. त्याच दिवशी राज्याचे परीवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे रमेश कदम, तसेच अनिल परब यांचे सीए यांच्या घरी देखील आयकर विभागाने छापेमारी केली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणेचा वापर करत असल्याची टीका सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली होती.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून राज्याला बदनाम करण्यासाठी एनसीबीचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत होता. मुंबई एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे हे त्यावेळी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात रोज नवीन नवीन ड्रग्ज संबंधित मोठ्या कारवाया करत होते. त्यात प्रमुख्याने महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांचे जवाई यांना देखील समिर वानखेडे यांनी अटक केली होती. तेव्हापासून समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांचा वाद जगजाहीर आहे.
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात सर्वात अधिक कारवाई करणारी केंद्रीय यंत्रणा म्हणजे ईडी. माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. तर अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांना चौकशीकरीता समन्स देखील पाठवलेले आहे. या पूर्वीदेखील अनेक नेत्यांची चौकशी ईडीने केलेली आहे. त्यात प्रामुख्याने परीवहन मंत्री अनिल परब, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार भावना गवळी, प्रताप सरनाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, माजी खासदार आनंदराव अडसूळ, आमदार रवींद्र वायकर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या कारखान्याची चौकशी यासह अनेक महाविकास आघाडीच्या नेत्यांची चौकशी ईडीकडून सुरू आहे.
या सर्व प्रकाराला महाविकास आघाडीने देखील जशास तसे उत्तर देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे, राज्यातील भाजप नेत्यांविरोधात राज्य सरकारने चौकशी देखील सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार प्रसाद लाड, विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक भाजप नेत्यांची चौकशी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे, केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार हा सामना असाच सुरू राहणार आहे. मात्र, आतापर्यंत दोन एजन्सींकडून नेत्यांवर कारवाई होत होती. आता आणखी एक यंत्रणा सक्रिय झाल्याने पुन्हा महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा -HM On Devendra Fadnavis : गोपनीय पत्र बाहेर कसे गेले याची चौकशी सुरु, दंगा करायची गरज नाही : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील