मुंबई -राज्यात ब्रेक द चैन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये ७ जूनपासून शिथिलता देण्यात आली आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ५.२५ इतका होता, मागील आठवड्यात हा रेट ४.४० इतका झाला होता. आता त्यात आणखी घसरण झाली असून, सध्या ३.७९ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट आहे. तसेच केवळ २३.५६ टक्के इतकेच ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले आहेत. त्यामुळे मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. मुंबईत लोकसंख्या जास्त असल्याने सध्या तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू आहेत. आता मुंबई महापालिका पहिल्या की दुसऱ्या स्थराचे निर्बंध लागू करणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आणि रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने १४ एप्रिलपासून राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला होता. रुग्णसंख्या कमी झाल्याने ७ जूनपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देताना सरकराने पाच स्थर निश्चित केले. त्याप्रमाणे नियमही शासनाने आखून दिले आहेत. देशाला मुंबई मॉडेलचे धडे देणारी मुंबई मात्र तिसऱ्या स्थरात होती. मुंबईत ४ जून पर्यंत ५.२५ टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. ४ जून ते ११ जून या आठ दिवसात ४.४० टक्के इतका रेट कमी झाला. ११ जून ते १८ जून या आठ दिवसात पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी होऊन ३.७९ टक्के इतका झाला आहे.
पॉझिटिव्हिटी रेट घसरला
मुंबईत ४ ते ११ जून या आठ दिवसांच्या कालावधीत २ लाख ६९ हजर ५६९ चाचण्या करण्यात आल्या, त्यापैकी ११ हजार ८७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले होते. यामुळे पॉजिटिव्हिटी रेट ४.४० टक्के इतका होता. याच कालावधीत १२ हजार ५९३ ऑक्सिजन बेड्सपैकी ३ हजार ४१६ बेड्सवर रुग्ण होते. तर ९ हजार १७७ बेड्स रिक्त होते. एकूण बेड्स पैकी २७.१२ टक्के बेड्वर रुग्ण होते. यामुळे मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. आता ११ ते १८ जून या कालावधीत १२ हजार ५९३ पैकी ९ हजार ६२६ ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. २ हजार ९६७ ऑक्सिजन बेडवर सध्या रुग्ण आहेत. मुंबईत सध्या 23.56 टक्के ऑक्सिजन बेड रुग्णांनी व्यापले असल्याने नियमानुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे.
महापालिकेच्या निर्णयाकडे मुंबईकरांचे लक्ष
ब्रेक द चैन आदेश काढताना मुंबई तिसऱ्या स्थरात होती. मागील आठवड्यात मुंबईचा समावेश दुसऱ्या स्थरात झाला होता. मात्र मुंबईमधील लोकसंख्या आणि होणारी गर्दी लक्षात घेत महापालिकेने तिसऱ्या स्थराचे निर्बंध लागू केले होते. आता पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या संखेनुसार मुंबईचा समावेश पहिल्या स्थरात झाला आहे. यामुळे मुंबई महापालिका तिसऱ्या स्थराऐवजी पहिल्या किंवा दुसऱ्या स्थराचे निर्बंध लागू करते याकडे आता मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचा गिरीश महाजनांना टोला, म्हणाले...